जनताच तुमचा बंदोबस्त करणार- पोलिसांनी अडवल्यानंतर रोहित पवार आक्रमक; SRPF केंद्राच्या उद्घाटनाचा वाद, कुसडगावात पाहा काय झाले

Khozmaster
2 Min Read

अहमदनगर  : कुसडगाव (ता. जामखेड) येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घटनावरून गुरूवारी वाद झाला. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना केंद्राबाहेरच अडविले. या केंद्रावरून सुरवातीपासूनच रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या श्रेयवाद सुरू आहे. काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडल्याचा आरोप करीत पवार तेथे उद्घाटनासाठी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडविले. त्यामुळे पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

अहमदनगरमधील जामखेड कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. आधी हे केंद्र जामखेड तालुक्यात मंजूर झाले होते. त्यानंतर ते जळगावला गेले. पुन्हा कुसडगावला आले. त्यावेळी भाजपने हा प्रकल्प जिल्हाबाहेर पळविल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला होता.या केंद्राचे काम पूर्ण झाल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी आज उदघटनाचा कार्यक्रम ठेवला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण होणार होते. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेरच रोहित पवार यांना अडविले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.यासंबंधी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, ”राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून पडतात. कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड) एसआरपीएफ केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय. तुम्ही कितीही लावा बंदोबस्त. स्वाभिमानी जनताच तुमचा बंदोबस्त करेल,” असे पवार यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *