बुलडाणा, दि. 7 : सध्यस्थितीत सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोप्टेरा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीची प्रादुर्भावाची वेळ ही साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळ्यापानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. ज्यामुळे त्या दिसत नाहीत.
या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ही अंड्यातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्ये पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानांना छिद्र पाडत नाहीत. त्यामुळे असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठ्या झाल्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात आणि पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळ्या फुलेही खातात.
या किडीचे व्यवस्थापन करताना सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी आणि अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावीत. भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात 8 ते 10 प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत. 5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही 500 एलई विषाणू 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या उपयुक्त बुरशीचा 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावे आणि निरिक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी ही 10 अळ्या प्रति मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी अशी आहे.
किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. यात किड कीटकनाशके प्रमाण प्रति 10 लिटर पाणी तंबाखूवरील पाने खाणारी अळी फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली इमामेक्टीन बेन्झोएट 1.90 ईसी प्रति 4 ग्रॅम 8.5 मिली, टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी 5 मिली, स्पायनोटोरम 11.7 एससी 9 मिली, इंडोक्झाकार्ब 15.80 ईसी 6.7 मिली, नोव्हाल्युरोन 5.25 अधिक इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 15.5 मिली फवारणी करावी.
कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पंप पेट्रोल असल्यास हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा जेणेकरून विषबाधा होणार नाही, असे कृषि विभागाने कळविले आहे.