शिकवणी वर्गासाठी पैसे नसल्याने गळफास लावून जीवन संपविले…
देवेंद्र सिरसाट नागपूर
जिल्हातील जलालखेडा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आई-वडिलांकडे शिकवणी वर्ग लावण्यासाठी पैसे नसल्याने येथील एका हुशार विद्यार्थिनीने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजना संजय सातपुते वय 20 वर्ष असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.20 वर्षाची संजना सातपुते ही विद्यार्थिनी शिक्षणात अतिशय हुशार होती. पण घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची आणि हालाखीची होती. ती स्वतः काम करून वरूड येथे शिक्षण घेत होती. तसेच तिला काटोल येथे कॉम्प्युटरचे क्लासेस लावायचे होते. परंतु पैसे नसल्यामुळे ती क्लास लावू शकली नाही. त्यामुळे ती नेहमी चिंतेत असायची. नोकरी लागू द्या मी सर्व ठीक करेल, असे ती नेहमी आई-वडिलांना म्हणायची. दरम्यान गुरुवारी दि.15 डिसेंबर ला सायंकाळी घरातील सर्व जेवण करून झोपले असताना. संजना व तिची लहान बहीण बाजूच्या खोलीत झोपायला गेल्या. लहान बहिणीला रात्री11.30 वाजताच्या सुमारास जाग आली. तेव्हा संजना तिच्या खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. ही माहिती तिने आई-वडिलांना दिली. त्यांनी खोलीत जाऊन बघितले असता ही घटना समोर आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जोगेकार करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी पेटविली कागदपत्रे
मृतक संजना हिने तीन दिवसांपूर्वी आपण शिक्षण घेउ शकत नसलेल्या निराशेतून काही कागदपत्रेसुद्धा पेटवली. घरची परिस्थिती व पैशांची अडचण त्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचले, अशी चर्चा आहे. गरिबीने तिचा जीव घेतला असे बोलल्या जात आहे.