आयुष्य हे सर्वांकडे आहे, पण ते जगता आलं पाहिजे. हसणं, खेळणं, फिरणं, मनमोकळेपणाने जगणं हे कोणाला नको असतं, सर्वांना हवं असत. काहींना ते जमत देखील, पण सर्वांना जमत नसतं. असं का होत असेल बरं ?
कारण, प्रत्येकाची विचारसरणी म्हणजेच विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत वेगळी असते आपापल्या पद्धतीने माणुस जगत असतो, त्यात माणसाचा अहंकार, द्वेश, तसेच मान-अपमानाच्या गोष्टी असतात. अशी माणसं आपलं आयुष्य तरी जगतात पण ते आनंदमय, समाधानकारक नसतं, त्यामध्ये एक बंद मुठी सारखी म्हणजेच संकुचित विचारसरणी असते. ते कधी आपली बंद मुठ उघडत नाहीत, कारण त्यांचा अहंकार, द्वेश, आणि स्वतःलाच हवा असणारा मान आणि मीपणा दडलेला असतो. मोकळेपणाने वावरण्याचा ते कधी प्रयत्नच करित नाहीत, मन मोठ करून मोकळेपणाने कधी बोलत नाहीत, दुसऱ्यांच्या बाजुने तरी ते कधी विचारच करित नाहीत, फक्त दुसऱ्यांकडून त्यांना जेंव्हा जेव्हा जे हवं ते त्यांना पाहिजे असतं, आणि जर तसं होतं नसेल, तर ते स्वतः तरी समाधानी जीवन जगत नाहीत आणि दुसऱ्यांना देखील जगू देत नाहीत.
अशी माणसं सतत काहीना काही लहान अगदी क्षुल्लक कारणावरून मनात कुजबुज करत असतात, अशा गोष्टी सारखं बोलत असतात, मनात धरून ठेवतात ज्यापासून ना त्यांचा ना दुसऱ्यांचा काडीमात्र आयुष्यात काहीच फायदा नाही, त्यामुळे सारखं भांडण चालू असतात, तसं ही बाब प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. म्हणूनच म्हणतात कोणाच्या घरामध्ये भांडण नाही सर्वांच्या आहेच.
सासु-सुनाचं भांडण असतं, कुठे भावजयींच भांडणं असत, जावांच भांडण असत, तर कुठे भावा-भावांच भांडण असत. हे सर्व कशामुळे होतं ? तर अहंकार, मीपणा मी जे बोलेल तेच खरं एकमेकांच एकमेकांना पटत नसल्यामुळे, कोणीच कोणाला परिस्थितीनुसर समजून घ्यायला तयार नसतं. परिस्थितीनुसार म्हणजे कसं ? घरांमध्ये एखादी परिस्थिती असेल म्हणजे जे काही असेल ते किंवा जो विषय असेल तो त्या परिस्थितीला किंवा विषयाला जे खरंच अनुकूल आहे जे योग्य आहे तेच करणं गरजेचं असतं. पण इथं कसं होतं प्रत्येकाची विचारसणी वेगवेगळी असते त्यामुळे घरामध्ये सारखं भांडण, तणावाची परिस्थिती उदभवते.
” सुख” हा शब्द आयुष्यात चांगले जीवन जगण्यासाठी खुप महत्त्वाचा आहे, पण हा शब्द वाचण्यापुरताच मर्यादित न ठेवता तो मनामध्ये गिरवला पाहिजे. सुख प्रत्येकाला हवं असतं, प्रत्येक माणुस एक- एक दिवस सुखासाठी झटतो. कोणी ” सुख” पैशामध्ये मोजतो, तर कोणी संपत्तीमध्ये, कोणी आपल्याला मिळणाऱ्या मान- अपनामध्ये आणि काहीजन आपली दुसऱ्यांकडून सेवा करून घेण्यामध्ये अशा खुप गोष्टी आहेत. प्रत्येक माणुस सुख शोधत असतो. खुप जण बोलतात अख्खं आयुष्य गेलं पण सुख भेटल नाही. आजकाल माणुस खुप मिळवतो आहे, परंतु ” सुख” हे अदृश्यच आहे. माणुस हा ” सुख” दुसऱ्यांकडून मिळण्याची अपेक्षा जास्ती ठेवतो.
पण नेमकं ” सुख” म्हणजे काय असतं हे जास्ती कोणाला कळलंच नाही, ज्यांना कळालं ते सुखाने आयुष्य जगतात, पण बाकीच्यांच काय ?
” काखेत कळसा गावाला वळसा” ही म्हण आहे, अगदी या म्हणीप्रमाणेच ” सुख” आणि माणुस यांची जोड आहे, असं मला वाटतं. ” सुख” हे सामान्यांतील सामान्य माणसांना देखील मिळू शकतं, सुख आणि आर्थिक भीमंती या वेगवेगळ्या बाबी आहेत असं मला वाटतं.” सुख” हे बाहेर शोधावं लागत नाही, ” सुख” हे पाहाव लागत नाही, तर ते जाणवलं पाहिजे, महसुस करावं लागतं. ” सुख” हे सर्वांत महत्त्वांच म्हणजे माणसांच्या विचारसरणीवर, मनावर अवलंबून असतं ते माणसाने विचारातून निर्माण करायचं असतं. माणसाने संकुचित विचाराची बंद मुठ उघडली पाहिजे, म्हणजेच आपल मन मोकळं केलं पाहिजे, कुठल्याही गोष्टी मनामध्ये न ठेवता त्या सोडून दिल्या पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न केलं पाहिजे पण ते मोकळ्या मनाने हसत, खेळत, आनंदी राहुन केले पाहिजे, जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर दुःखी न होता ते विसरून पुढे चाललं पाहिजे, आणि दुसऱ्यांकडून आशा अपेक्षा तरी कधीच ठेवू नये हे सर्वात महत्त्वांच आहे, ” सुख” हे स्वतःजवळच असतं पण ते ओळखता येत नाही, ज्या गोष्टींची काही गरजच नाही आणि ज्या नाही मिळाल्या तरी काहीच नुकसान होणार नाही अशा गोष्टींचा माणसाने त्याग केला पाहिजे, म्हणजे सर्व बाजुने विचार केला तर ” सुख” ही एक माणसिक बाब आहे आणि ते सुख कुठे बाहेर न पाहता स्वतःमधेच आहे, हे ओळखून समजून ते निर्माण केलं पाहिजे. म्हणजे ” सुख” हे माणसांजवळचं आहे, ते साऱ्यांच्याच हाती आहे..!!
नको भरकटू सुखासाठी इकडे-तिकडे
नको पाहु तु आता सुखाची वाट….
नको देऊ ओझे आशा, अपेक्षांचे कुणाकडे
घे जाणुन सुख मनी तुझ्याच दाट..!!
Users Today : 1