अकोला – लम्पि चर्म रोग हा संसर्गजन्य आजार असून यांच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाव्दारे युद्धस्तरावर लसीकरण चालू आहे. आजपर्यंत 2 लक्ष 7 हजार 104 जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण सुरु आहे. तसेच हा आजार ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग असून माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधीत गायीचे दुध देखील सुरक्षित असून त्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाने बाधीत जनावरांची एकूण संख्या 1803 असून आजार नियंत्रणासाठी बाधितांचा उपचार, अबाधितांचे लसीकरण, गोठा निर्जंतुकीकरण, गोचीड/गोमाश्या निर्मुलन इत्यादी उपाययोजनाव्दारे महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाव्दारे शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
Users Today : 22