प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द व दर्जेदार मालाचा , पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत त्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात . जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठक पार पडली . बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार , अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे ( अन्न ) , उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी , जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिलीप पाटील , अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार , समाधान बारी , प्रदिप वळवी आदी उपस्थित होते . जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या की , आगामी काळात येणाऱ्या सण , उत्सव काळात भेसळयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशा परिस्थितीत अन्नपदार्थामधील भेसळ कशी ओळखावी यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी . अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रत्येक अन्न व्यावसायिकाने अन्न पदार्थ उत्पादन , साठवण , वितरण , वाहतूक व विक्रीसाठी अन्न व परवाना तथा नोंदणी करणे बंधनकारक आहे . त्यानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकांने नोंदणी करावी . जिल्ह्यातील सर्व अन्न आस्थापनाची नियमित तपासणी कराव्यात . बचत गटांना अन्न परवाना व नोंदणी प्रमाणपत्रे देण्याबाबत मार्गदर्शन करावे , अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात . सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी सांगितले , या वर्षांत 1 एप्रिल 2022 पासून अन्न व आस्थापनाची तपासणी करुन नंदुरबार जिल्ह्यात 33 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे . आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात येवून या मोहिमेच्या माध्यमातून अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले .
Users Today : 11