शेतकऱ्यांचा ‘मॉडर्न’ नायक

Khozmaster
4 Min Read

शेतकऱ्यांचा ‘मॉडर्न’ नायक

साधारण १९९१ ला जागतिकीकरणाचे वारे वाहु लागले. बंदिस्त असणार्या जगाच्या बाजारपेठा खुल्या झाल्या. त्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेची बुरुजं ढासळलेली होती. नुसता ‘बुस्टर डोस’ देऊन इकॉनॉमीला पुर्वपदावर आणणं म्हणजे डोंगर पोखरुन उंदिर काढल्यासारखं होतं. तिला पुनर्जिवित करण्यासाठी नरसिंहराव सरकारकारने जंग जंग पछाडलं आणि पर्याय म्हणुन भारताच्याही बंदिस्त अर्थव्यवस्थेची द्वारे सताड उघडी करुन ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे जहाज थेट १८० च्या कोनातच वळविण्यात आलं. अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. ग्लोबलायझेशनमुळे कृषी क्षेत्रावर त्याचे दुरगामी अनुकुल परिणाम दिसुन आले. कृषीप्रधान असणार्या भारत देशासाठीही ग्लोबलायझेशनमुळे इतर देशांच्या बाजारपेठा खर्या अर्थाने अपवाद वगळता खुल्या झाल्या. बाजारपेठेत टिकण्यासाठी निर्यातदार देश होणं गरजेचं होतं. त्यासाठी कृषी क्षेत्रात आधुकिकरण आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातुन उत्पादन वाढवणं गरजेचं होत. त्यासाठी इच्छाशक्ती परिश्रम आणि नवनवीन प्रयोग करुन शेती करणार्या शेतकर्यांची आजपर्यंत वाणवा दिसुन आली. परिश्रमाचा अभाव, शेतीक्षेत्रातल्या ज्ञानाचा अभाव यामुळे चाकोरीबध्द शेती करण्याकडे आजही बर्याच शेतकर्यांचा कल दिसुन येतो पण काही प्रचंड ईच्छाशक्ती, बुध्दिमत्ता आणि प्रसंगी परिश्रम बाळगलेले तरुण मात्र याला अपवाद ठरतात आणि इतरांसाठी प्रेरणा आणि आदर्श ठरत असतात. असाच एक साधारण तिशितला निसर्गदत्त कुशाग्र बुध्दिमत्ता लाभलेला राजबिंडा युवक इंजिनिअर, डॉक्टर, वकील होण्याऐवजी कृषीपदवीधर झाला. आधुनिक पध्दतीने शेती करत यशस्वी झाला आणि आज इतर शेतकर्यांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात निघोज नावाचे बाजारपेठेचं गाव आहे. मळगंगा देवी, कुकडी नदी आणि त्या कुकडीच्या पात्रात तयार झालेल्या रांजणखळग्यांचं आकर्षण महाराष्ट्र आणि देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना असतं. नगर – पुणे रस्त्याने प्रवास करणारे अनेक पर्यटनप्रेमी वाट वाकडी करुन निघोजच्या रांजणखळग्यांना भेट देतात यात नवल वाटण्याचं कारण नाही. त्यायोगे मळगंगा देवीचं दर्शनही होतं. हा पाटपाण्याचा भाग आहे. कुकडीच्या कालव्यामुळे हजारो एकर ओलिताखाली आलेले शेतकरी ऊस, कांदा, टॉमॅटो या पिकांना येथील शेतकरी प्राधान्यक्रम देत असतात. पण या गावची अजुन एक ओळख तयार झाली आहे. त्यासाठी अनेक शेतकरी, बुध्दीजीवी, सुशिक्षित लोक वाट वाकडी करुन येतातच. येथुन नवं काहीतरी शिकुन जातात आणि शेतीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन घेऊन जातात.

राहुल रसाळ हा मॉडर्न शेतकरी गावचीच नव्हे तर तालुक्याची ओळख झाला आहे. या शेतकर्यानं आपल्या अनोख्या शेतीच्या माध्यमातुन अनेकांना अचंबित केले आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, प्रतिथयश राजकारणी, उद्योगपती एवढेच नव्हे तर सेलिब्रिटींनी या पठ्ठ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. राहुल रसाळ यांच्या द्राक्ष, डाळिंब, पेरु, कलिंगड यांचे अनोखे उत्पादन घेण्याच्या त्यांच्या कौशल्यावर अनेक होतकरु शेतकरी भाळले आहेत. राहुल यांचे आई – वडिल शेतकरी होते पण इतर आई – वडिलांप्रमाणे आपलं स्वप्न मुलाच्या माथी न मारता मुलाला हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्याची मुभा दिल्याने मुलालाही आभाळ ठेंगणं झालं. मुलानेही शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे राहुल रसाळ यांनी कृषीपदवीधर होण्याचा निर्णय घेतला आणि तेथुन बाहेर पडल्यानंतर आपल्या घरच्या शेतीत वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरवात केली. शेतीला हवामान खुप गरजेचे असते म्हणुन हवामानाचा अंदाज यावा यासाठी त्यांनी आपल्या शेतीत हवामान केंद्र उभारले. जिवाणु तयार करण्याची प्रयोगशाळा राहुन रसाळ यांनी उभारली आहे. आतापर्यंत अनेक शेतीतले शास्त्रज्ञ राहुल रसाळ यांच्या शेतीला भेटी देउन गेले आहेत. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती करण्याकडे राहुल रसाळ यांचा कल दिसुन येतो. यासाठी त्यांच्याकडे देशी गीर गायी आहेत. ते शेण आणि गोमुत्रापासुन स्लरी तयार करतात त्यासाठी त्यांनी मोठा टँक तयार केला आहे. कारले, कर्डुली, ढोबळी, टॉमटोच्या इत्यादी भाजीपाला उत्पादन ते घेत असतात. त्यांची शेती पाहुन राज्यभरातील शेतकरी त्यांच्याप्रमाणे शेती करताना दिसुन येतात. गेल्याच वर्षी त्यांना कृषी क्षेत्रातला मानाचा समजला जाणारा राज्य सरकारचा ‘उद्यान पंडित’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यापुर्वीही त्यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. नुकताच २५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर यांचा १८ वा स्थापना दिन संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रगतशील डाळींब शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. राहुल रसाळ या पारनेरच्या मातीतल्या हाडाच्या शेतकर्याचा उच्च प्रतीच्या डाळिंब उत्पादनासाठी सन्मान याठिकाणी करण्यात आला त्यावेळी या पारनेरच्या मातीलाही अभिमानाने गलबलुन आलं असेल.

 

लेखक- दत्ता पवार (मो- ९६५७६०८३३२)

(लेखक हे पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत) 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *