गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा शहरातून सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे शहराची शांतता भंग होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देऊन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकावर कारवाई करावी असे शहरातील सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून तसेच महाविद्यालय परिसरातील रस्त्यावरून कर्णकर्कश आवाजाची वाहने सुसाट वेगाने धावत असतात, दिवस आणि रात्री ध्वनी प्रदूषणाची ही पातळी किती असावी हे पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ठरवून दिलेले आहे. याचे जाणून-बुजून उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस मोटर वाहन कायद्यानुसार आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे ज्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होऊ शकते, त्या सर्वांना हा कायदा लागू आहे, मात्र ध्वनी प्रदूषणाचा कायदा अस्तित्वात असूनही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ध्वनी प्रदूषण होत असताना व सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अद्यापही कारवाई होत नाही. यामुळे टवाळखोर युवकांच्या दुचाकी वाहनाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धूम स्टाईल मध्ये गाड्यांचे वेड असलेल्या काही मुलांनी दुचाकींना फॅन्सी सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावून लोकांचे जीवन जगणे असह्य केले आहे. या दुचाकीच्या अति दाबाच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. याचे मानवी जीवनावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. *,वेगावर मर्यादा आणणे आवश्यक** [मोठ्या आवाजामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो. सततच्या मोठ्या आवाजामुळे कानाची मेंदूला जोडणारी नस हळूहळू कमजोर होऊन नकळतपणे बधीर पणा येतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा वाढतो. अशा वाहनांवर कारवाई करून वेगावर मर्यादा आणावी अशीही मागणी नागरिकातून होत आहे.]