पालघर प्रतिनिधी सौरभ कामडी
दि.१३ मार्च २०२३.
पालघर –जिल्ह्यातील आदिवासी बहुल मोखाडा तालुक्यात भरणारा आदिवासी संस्कृतीच्या पारंपारिक नृत्याचा कला आविष्कार जपणारा बोहाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. बोहाडा अर्थातच श्री जगदंबा मातेचा याञोत्सव. गावात सुख शांती ,समृद्धी नांदावी,चांगले पिक यावे त्यासाठी देवीला साकडे घालतात.यासाठीच आदिवासी बांधव जगदंबा मातेचा याञोत्सव साजरा करतात.हा याञोत्सव म्हणजेच, बोहाडा. बोहाडा उत्सवाला अडीशे वर्षाहून हि जुनी पिढी जात ऐतिहासिक आदिवासी संस्कृती लाभलेली आहे. होळीचा सण झाल्यानंतर धुलिवंदना पासुन ८ दिवस मोखाड्यात जगदंबा मातेचा याञोत्सव बोहाडा भरविला जातो.फाल्गुन पौर्णिमा मंगळवार ७ मार्च२०२३ ते फाल्गुन कालाष्टमी १४ मार्च २०२३ पर्यत म्हणजेच आठ दिवस बोहाडा उत्सव भरविण्यात आला. ह्या जगदंबा मातेच्या बोहाडा उत्सवात लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. भाविकांच्या नवसाला पावणारे दैवत म्हणून मोखाड्याची श्री जंगदंबा माता प्रसिध्द आहे. हि जगदंबा माता भाविकांसाठी तारणहार असल्याने ती भक्तांची श्रध्दा स्थान आहे. मंदिरांपासुनच देव देवतांचे मुखवटे परिधान केलेली बोहाड्याची सोंगे निघतात.धुळवडी पासुन गणेशाच्या पुजनाने बोहाड्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.बोहाडा उत्सवासाठी असलेले सोंगाचे मुखवटे उंबर व सागाच्या लाकडापासुन बनविलेले असतात.त्यांना आकर्षक अशी रंगरंगोटी केली जाते,सजावट केली जाते.बोहाडा उत्सवाआधीच महिनाभरा आधीच हि तयारी केलेली असते. बोहाडा उत्सव म्हणजे रामायण ,महाभारतातील देव,देवता,दानव,राक्षस,युद्ध यांचे मुखवटे परिधान करुन कलाकार आकर्षक वेशभूषा,रंगरंगोटी करुन पाञ सजवतात व राञी टेंभे, मशालीच्या उजेडात सोंगे पारंपारिक संबळ,पिपाणी,सनईच्या ताला सुरात सोंगे राञभर नाचविली जातात.रामायण, महाभारतातील कथा, रावण- राम,लक्ष्मण युध्द, भीम हिडिंबा विवाह ,विष्णूचा मस्य अवतार,दैत्य युद्ध ,वराह अवतार,भीम-बकासुर युध्द,हिरण्यकश्यप युध्द,भस्मासूर-मोहीनी युध्द या सारखी विविध सोंगे लहान बोहाड्या दरम्यान नाचविली जातात तर मोठ्या बोहाड्याच्या दिवशी हि सर्व सोंगे काढतात.अष्टमीच्या दिवशी जंगदंबा मातेची महापूजा केली जाते.त्यानंतर जंगदंबा व महिषासूर युध्द हे शेवटचे सोंग नाचविले जाते.त्यात जगदंबा माता विजयी झाल्यानंतर तिची भव्य अशी मिरवणूक गावात काढली जाते.मिरवणुकी आधी घरांसमोर रांगोळी काढली जाते.अशी बोहाडा उत्सवाची परंपरा आहे.त्याच बरोबर जगदंबा उत्सव कमिटी कडून साईबाबा मंदिराजवळ कुस्त्यांचे सामने भरविले जातात.ह्या कुस्त्या खेळण्यासाठी नाशिक, सांगली,पालघर,ठाणे,याठिकाणाहून मल्ल आले होते.कुस्त्यांच्या सामन्यांनंतर मोखाडा बोहाडा उत्सवाची अखेर सांगता झाली.अशा ह्या मोखाडा बोहाडा उत्सवात लाखो भाविकांची गर्दी उसळली होती.माञ मोखाडा पोलिस प्रशासन यंञणेचा बंदोबस्त चोख असल्याने बोहाडा उत्सव शांततेत पार पडला.मोखाडा जंगदबा बोहाडा उत्सव कमिटी व मोखाडा पंचायत समिती कडून उत्सवाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
मोखाडा बोहाडा याञेत दुकानांची रेलचेलआकाश पाळणे,खेळण्यांची दुकाने,कपड्यांची दुकाने,खवय्यांसाठी विविध हाँटेल,फळांची दुकाने,कोल्ड्रिंक,दैनंदिन वस्तूंची दुकाने अशा विविध दुकानांनी मोखाडा याञोत्सवाची बाजारपेठ फुलली होती. याञेत ग्राहकांच्या खरेदीची झुंबड पाहावयास मिळत होती.मोखाडा बोहाडा उत्सव राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक मोखाडा तालुक्यातील बोहाडा पाहण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात.त्यामुळे बोहाडा उत्सवात सर्व धर्मिय धंद्या निमित्त अथवा कोणत्या ना कोणत्या व्यवसायामुळे याञेशी आपोआपच जोडला गेला आहे. त्यामुळे याञेत सर्वधर्मियांनी विविध व्यवसाय,दुकाने लावलेली असतात.त्यामुळे मोखाडा बोहाडा हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक ओळखला जातो.
Users Today : 28