महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे

Khozmaster
4 Min Read

महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, इतिहासविषयक व नाट्यादी क्षेत्रांतील कार्य, कीर्ती नि कामगिरी महशूर आहे. त्यांचे वादळी व्यक्तिमत्त्व विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्घटनेच्या कार्यक्षेत्रात सतत गाजत राहिले आहे. अशा ह्या थोर पुरुषाच्या ज्ञानगंगेचे पाणी मी अनेकदा प्राशन केल्यामुळेच प्रबोधनकारांच्या `जीवनगाथे`स प्रस्तावना लिहिण्याचा हा बहुमान मला देण्यात आला असावा, असे मला वाटते.प्रबोधनकार म्हणजे एक बहुरंगी, बहुढंगी नि बहुरूपी कर्तृत्ववान पुरुष, जिनगर, छायाचित्रकार, तैल चित्रकार, पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, चळवळे, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार नि इतिहासकार अशा विविध भूमिका त्यांनी वठविल्या. अशा ह्या महाभागाच्या गतिशील जीवनात अनेक संकटे कोसळली. लाभहानीचे व सुखदुःखाचे प्रसंग उद्भवले. संघर्ष नि संगर झाले. त्यांना निधडेपणाने तोंड देऊन त्यांवर त्यांनी जी मात केली, त्याचे ठसठसीत, रसरशीत नि प्रभावी कथन करणारी ही `जीवनगाथा` आहे. गोव्यापासून नागपूरपर्यंत सर्व महाराष्ट्र पायाखाली घालून महाराष्ट्रातील समाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केलेल्या महाराष्ट्राच्या एका पराक्रमी पुत्राच्या ह्या आठवणी आहेत.

प्रबोधनकारांची ही `जीवनगाथा` प्रसंगोपात सहज स्फुरलेल्या विविध प्रकारच्या आठवणींना एकत्र गुंफून तयार केलेली आहे. ती एक आटोपशीर कलाकृती असली तरी तिची मांडणी काही स्थळी, कालानुक्रमांच्या अभावी जितकी सुसंगत, बांधीव व प्रमाणबद्ध व्हावयास पाहिजे होती तितकी होऊ शकली नाही. त्याचे कारण आत्मचरित्र लिहावे अशी त्यांना आयुष्याच्या सोनेरी सायंकाळीही विशेष इच्छा झाली नव्हती वा उत्सुकता वाट्त नव्हती, हे होय.

आत्मचरित्र व आठवणी ह्यांत जरी अनेक गोष्टीत साम्य असले, तरी त्यांत एक महत्त्वाचा फरक असतो. आठवणीत अवतीभोवतीच्या परिस्थितीवर व बाह्य घटनांवर अधिक भर दिलेला असतो, तर आत्मचरित्रात आत्मचरित्रकाराच्या अंतरंगावर, आत्मपरीक्षणावर नि मनोविश्लेषणावर प्रकाश टाकलेला असतो. त्यात मनातील व्यापारांचे, कंगोऱ्यांचे नि अंतःसृष्टीतील स्थित्यंतरांचे विश्लेषण असते. आणखी असे की, निरपवाद, निर्भेळ सत्य हा आत्मचरित्राचा प्राण असतो. मनुष्य स्वभाव असा असतो की आत्मचरित्रकार स्वतःच्या कामाविषयक, अनैतिक, अप्रिय, लबाडीच्या गुप्त गोष्टी आडपडदा न ठेवता अगदी विवस्त्र स्वरूपात प्रकट करू शकत नाही. सभ्यपणा, सौजन्य व समंजसपणा बाळगून आणि आप्तांच्या व इष्टमित्रांच्या भावनांची कदर करून बहुधा आत्मचरित्रे लिहिली जातात.

यास्तव सर्वांगपूर्ण व सर्वस्वी निर्दोष, निर्मळ नि नितळ स्वरूपाचे आत्मचरित्र केव्हाही प्रकाशात येऊ शकत नाही, असे म्हटले तरी चालेल. अपूर्णता हा मानवी सृष्टीचा नियम आहे. हे जाणूनच सूज्ञ व्यक्ती अटळ असलेला आत्मगौरव, परनिंदा व अतिशयोक्ती शक्य तो टाळण्याचा प्रयत्न करून आत्मचरित्र वा आठवणी प्रसिद्ध करतात. स्वदोषांविषयी व परदोषांविषयी पराकोटीची घृणा व्यक्त केलेली आत्मचरित्रे विरळच. मात्र स्वतःच्या भग्न मनाला वा संसाराला प्रसिद्धीचा विरंगुळा लाभावा म्हणून फक्त आप्तमित्रांच्या

चारित्र्यावर लालभडक झोत टाकून सहानुभवी व्यक्तीकडून आत्मगौरव साधणाऱ्या काही व्यक्ती आठवणी प्रसिद्ध करतात, हे काही खोटे नाही.

आपली जीवनयात्रा आपण कशी केली हे कथन करताना प्रबोधनकारांनी आपल्या जीवनाचे एक सूत्र सांगून टाकले आहे. ते सूत्र म्हणजे “जन्मप्राप्त नि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम वठविण्यांची धडपड करणारा (मी) एक धडपड्या नाटक्या” हे होय. ह्या `जीवनगाथे’चे एक वैशिष्ट्य आहे ते असे की, ह्या आठवणी त्यांनी कर्तव्यबुद्धीने व कृतार्थ भावनेने कथन केल्या आहेत. त्यांच्या जीवनाशी ज्या ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या ज्या घटना घडविण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या ज्या इतर घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे त्यांचे त्यांनी कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन ह्यांच्या स्थित्यंतरांची रसभरित व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत. त्यात काही जनतेच्या कैवाऱ्यांची, अज्ञात, सच्च्या व त्यागी अशा अनेक समाजसेवकांची, नाट्य, कला व काव्य या क्षेत्रांतील महानुभावांची, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील कर्मयोग्यांची हृदयंगम शब्दचित्रे व व्यक्तिदर्शने घडविली आहेत. त्यांवरून आपल्या कालखंडाचे प्रबोधनकार कसे डोळस सांक्षी आहेत, हे मनावर ठसते.

 

संजय धाडवे

नाशिक

 

0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *