
प्रभू श्रीराम यांच्या असीम त्यागाची महती भाविकांच्या ओठावर खेळती ठेवली.
लोकजागर मंचच्या उपक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद,
रितेश टीलावत प्रतिनिधी तेल्हारा/ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व दोन्ही तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या “लोकजागर मंच” यांनी रामनवमी पर्वावर अकोटातील नागरिकांना प्रथमच दिग्गज गायकांच्या वाणीतून प्रभू श्रीराम गौरव ऐकण्याची पर्वणी गुरुवार ३० मार्चला सायंकाळी ६ वाजता “राम जनीं राम मनी ” या भक्ती संध्येच्या आयोजनातून उपलब्ध करून दिली होती. या भक्तीसंध्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, अदिती प्रभुदेसाई आणि मंदार भिडे या सिनेगायकांनी आपल्या संचासह स्वरसेवा प्रदान केली. कार्यक्रमाची सुरूवात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलन करून झाली.या भक्तिसंध्या कार्यक्रमात गायकांनी एकाहून एक सरस प्रभू श्रीराम यांची भक्तिगीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला गावातील गणमान्य व्यक्ती व श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये महिलांची उपस्थिती बहुसंख्येने होती. दशरथा घे हे पायसदान” या गीताने श्रोते अतिशय भावनिक झाले होते तर “राम जन्मला ग सखी राम जन्मला” या गीताने रसिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या अतिशय गोड, मधुर, सुरेल आवाजातील भक्तीगीताने वातावरण भक्तिमय होवून श्रोतागण अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले. संस्कृती, परंपरा यांची जोपासना व्हावी या दृष्टीने यशस्वी आयोजन केल्याबद्दल गणमान्य व्यक्तींनी लोकजागर मंचचे आभार मानून तोंड भरून कौतुक केले.या भक्तीसंध्येचे निवेदन दूरदर्शन वरील असंख्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन करणाऱ्या व संगीताच्या उत्तम जाणकार असलेल्या मुंबईच्या प्रख्यात निवेदिका शिवानी जोशी यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने रसिकांची मने जिंकली. त्यांनी संपूर्ण रामायणाचे चित्रच भाविकांच्या डोळ्यासमोर उभे केले. श्रोत्यांनी त्यांना प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला.या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे आयोजन व शिस्तबद्ध नियोजन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल दादा गावंडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकजागर मंचच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 19