राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं ‘एकमत’, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय

Khozmaster
2 Min Read

 लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात पार पडणार आहेत. यासाठी भाजपप्रणित एनडीए आणि ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी फुटून त्यातील अजितदादांचा गट एनडीएसोबत आहे, तर शरद पवारांचा गट इंडिया आघाडीसोबत. परंतु या दोन्ही गटांनी आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर अनेक गोष्टींवर मतभेद होत असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं याबाबतीत मात्र न ठरवता एकमत झाल्याचं चित्र आहे.राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा, अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाचं, हा वाद सुरु असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी लोकसभेची लिटमस टेस्ट मानल्या जाणााऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांना सामोरं न जाण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेशात भाजप, तर काँग्रेस राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत आहे. या पाच राज्यांमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आपलं बळ आजमावण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी संबंधित विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असता, तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकला असता. कदाचित राष्ट्रवादीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं ‘घड्याळ’ गोठवण्याचीही वेळ आली असती. त्यामुळे दोन्ही गटांनी निवडणुकांपासून लांब राहण्याचं ठरवल्याचं दिसत आहे.नऊ नोव्हेंबरला राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पुढील सुनावणी होणार आहे. त्याच वेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये न उतरत दोन्ही गटांनी निवडणूक चिन्हाचा पेच आपोआप टाळला आहे. कारण एकही उमेदवार लढणार असता, तरी मोठा पेच निर्माण होऊ शकला असता. परंतु दोन्ही गटांच्या निर्णयाने हा पेचप्रसंग टळला आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *