जैविक जाळीने स्तन पुनर्रचना, महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया नवी मुंबईत, कॅन्सरग्रस्तांना दिलासा

Khozmaster
2 Min Read

मुंबई : नवी मुंबईमधील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदा जैविक जाळीचा वापर करून स्तन पुनर्रचना शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया असून पूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही रुग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे.स्तनाचा कॅन्सर झाला की डॉक्टर कॅन्सरची गाठ काढून स्तन वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही वेळा पूर्णपणे स्तन काढून टाकावा लागतो. रुग्णाच्या पोटाच्या, पाठीच्या त्वचेचा काही भाग पुनप्रत्यारोपित करून स्तनाची पुनर्रचना करावी लागते. या क्षेत्रातील तज्ज्ञ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमर देशपांडे यांनी नव्या पद्धतीने स्तन पुर्नरचना शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली आहे. त्यांना या विषयात सतरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यावेळी डॉ. दिलीप होयसाळ उपस्थित होते.

जलद आणि सुरक्षित

पूर्वीच्या तुलनेत या नव्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमध्ये पाच ते सहा तासांचा अवधी लागतो. स्तनाची पुनर्रचना करताना शरीरातील पाठीचा, पोटाचा तसेच इतर त्वचेचा भाग घेतल्यावर संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. या नव्या पद्धतीमध्ये हा कालावधी सहा ते आठ आठवडे इतका लागतो.

ब्रॅक्सन पद्धती

या पद्धतीला ब्रॅक्सन पद्धती म्हणतात. दोन ते तीन तासांमध्ये ही शस्त्रक्रिया होते. त्यात रुग्णाच्या त्वचेचा भाग वापरला जात नाही. शस्त्रक्रिया सोपी असल्यामुळे वेदना कमी होतात. तीन ते चार आठवड्यांत रुग्ण बरा होतो. यामध्ये सिलिकॉन इम्प्लान्ट जैविक जाळीमध्ये गुंडाळून ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी अंदाजे पावणे दोन लाख रुपये इतका खर्च येतो.

रुग्णांच्या पुनर्वसनास लाभदायक

टाटा रुग्णालयामध्ये प्रत्येकवर्षी पाच हजार स्तनाच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांची नोंद होते. ‘या नव्या पद्धतीमुळे रुग्णांना निश्चितपणे लाभ मिळेल’, असा विश्वास या विभागाच्या प्रा. डॉ. शलाका जोशी यांनी व्यक्त केला. ‘महिलांचे स्तन शस्त्रक्रियेदरम्यान काढले असता त्यांचा आत्मविश्वास खालावतो. त्यामुळे रुग्ण पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये महिलांना आधार देण्यासाठी ही निश्चितपणे मदत देणारी शस्त्रक्रिया असेल’, असे रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *