महामेट्रोने गेल्या सहा वर्षांत ८८१ पदांसाठी जाहिराती काढल्या. त्या भरण्यातही आल्या. मात्र, आरक्षण डावलण्यात आले, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेने केला. आरक्षणाच्या नियमांचे पालन व्हावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला.बजाजनगर येथील जय जवान जय किसान संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे सचिव अरुण वनकर यांनी महामेट्रोने रिक्त जागा भरताना आरक्षणाच्या नियमांचे पालन करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे समन्वयक विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, प्रकाश डोंगरे, अभिनव फटिंग आदी उपस्थित होते. महामेट्रोच्या नोकरभरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २०१५पासून २०२१पर्यंत ८८१ पदांसाठी जाहिराती काढण्यात आल्या. त्या भरताना आरक्षणाचा वाटा अनुसूचित जातीसाठी १५ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७.५ टक्के, ओबीसीसाठी २७ टक्के, ईडब्ल्यूएससाठी १० टक्के ठेवण्यात आला होता. दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी विशेष प्रयत्न केले. नोकरीतील आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे. मात्र, अनेक ओबीसी संघटना या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. ओबीसी व मागासवर्गीय संघटनांचे पदाधिकारी हे राजकीय पक्षांचे नेते आहेत, त्यामुळे या विषयाकडे राजकीय समिकरणातून बघितले जात आहे, अशी खंत वनकर यांनी व्यक्त केली.
प्रवर्ग : महामेट्रोने भरलेल्या जागा : आरक्षित जागा
एससी : ४२ : १३२
एसटी : २४ : ६६
ओबीसी : ११३ : २३८
ईडब्ल्यूएस : १२ : ८८