मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे जेवढ्या नेटाने पुढे नेत आहेत, तेवढाचा ओबीसींकडून त्यांना होणारा विरोधही तीव्र होत आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या पातळीवर मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. अशातच मनोज जरांगे यांनी एकट्याने लढण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारा धनगर आणि मुस्लिम समाजालाही सोबत घेण्याची योजना आखल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांची भाषणे, मुलाखती आणि प्रत्यक्ष कृतीतूनही याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही समाजही यासाठी अनुकूल असल्याचे विविध घटनांमधून दिसून आले आहे.
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतरही या आंदोलनाची धार कायम आहे. शनिवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाखोंच्या सभेमुळे याची तीव्रता आणखी वाढली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत, अशी जरांगे यांची मांडणी आहे. नेमका यालाच ओबीसींचा विरोध असल्याने ओबीसी नेते जरांगे यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यातच ओबीसींचे प्रमुख नेते, मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यातील संघर्ष वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपला आहे. यातूनच ओबीसी आणि मराठा यांच्या संख्याबळाचीही तुलना सुरू झाली. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्याकडून धनगर आणि मुस्लिम समाजाला जवळ करण्याची कृती लक्ष वेधक ठरत आहे.
गेल्या आठवड्यात जरांगे नगर जिल्ह्यात आले होते. तेव्हा त्यांनी सभांची सुरवात चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून केली. मुख्य म्हणजे भाजपचे आमदार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी तेथे जरांगे यांचे जोरदार स्वागत केले. जरांगे अहिल्यादेंवीच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. मराठा आणि धनगर यांची आरक्षणासंबंधी समान समस्या आहे, असे बोलून त्यांनी धनगरांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यापुढेही अनेक सभा आणि मुलाखतींमधूनही जरांगे यांनी अशीच मांडणी सुरू ठेवली आहे.दुसरीकडे मागे पडलेला मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही जरांगे यांनी पुन्हा चर्चेत आणला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजही त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे. शनिवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेच्यावेळी मराठवाड्यातील मुस्लिमांनी ठिकठिकाणी मंडप टाकून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर सभेसाठी आलेल्यांना अन्नदान आणि पाणीपुरवठाही केला. आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे फ्लेक्सही लावण्यात आले होते. जरांगे यांनी सरकारला पुढील दहा दिवसांची मुदत दिलेली आहे. ती संपल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी त्यांच्यासोबत धनगर आणि मुस्लिम समाजही राहील, असे संकेत आता मिळू लागले आहेत