कर्डिलेंच्या दोन जावयांमध्येच आपसात जुंपली, संग्राम जगतापांच्या विरोधात संदीप कोतकरांचा शड्डू

Khozmaster
4 Min Read

अहमदनगर : सोयऱ्या-धायऱ्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा हेच सोयरेधायरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पहायला मिळते. असाच प्रकार यावेळी नगर शहर विधानसभा मतदासंघात पहायला मिळू लागला आहे. अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आता त्यांचे साडू माजी महापौर संदीप कोतकर यांनीच आव्हान दिले आहे. काहीही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे कोतकर यांनी म्हटले आहे. जगताप आणि कोतकर दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. त्यामुळे यात कर्डिले काय तोडगा काढणार? याकडे लक्ष लागले आहे.

कोतकरांचं पुनरागमन

नगर शहर विधानसभा मतदार संघात माजी महापौर कोतकर उभे राहणार असल्याची चर्चा होती. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्याला पुष्टी मिळाली आणि उघड चर्चा सुरू झाली. कोतकर यांनी तब्बल आठ वर्षांनी आपले स्पंदन प्रतिष्ठान मंडळाचा गणपतीही आणला व त्यामाध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या जुन्या खून खटल्यातील तक्रारदार शंकरराव राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कोतकर यांच्या जिल्हा बंदी उठवण्याच्या मागणीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितल्याने कोतकर पुन्हा चर्चेत आले. कोतकर यांच्या निवडणूक लढविण्यात त्यांच्याविरूद्धचा खटला ही अडचण असल्याचे सांगण्यात येते.

कोतकर यांची फेसबुक पोस्ट

या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोतकर यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ती व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये कोतकर यांनी म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगुज करू शकलो नाही. परंतु आता वेळ आलीय बोलायची. म्हणून आपल्याशी हितगुज करतोय. नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच.अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करताना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय, ही मनोमन इच्छा आहेच, असे यात आवर्जून नमूद केले आहे.महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापिही शक्य नाही. नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तुम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले अन हृदय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. लवकरच भेटूयात, असे कोतकर यांनी म्हटले आहे.

पक्ष ठरला नाही

कोतकर यांना महाविकास आघाडीच्या एखाद्या घटक पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शहरात चर्चा आहे. मात्र, त्याला कोणत्याच पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यानंतर आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढला होता. त्यामुळे सर्वच घटक पक्षातील स्थानिक पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. तशी त्यांची मोर्चे बांधणी सुरू होती. मात्र, कोतकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने इतर इच्छूक मागे पडल्याचे दिसून येते.

जिल्हाबंदी उठवण्यासाठी अर्ज

कोतकर यांना १६ वर्षापूर्वी झालेल्या अशोक लांडे खून खटल्यात जन्मठेप झाली आहे. त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शिक्षेला स्थगिती मिळाली असून त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र, नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्धच्या शिक्षेला स्थगिती असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, मात्र जिल्हाबंदीची अडचण होऊ शकते, असे संगण्यात येते. त्यांनी ही बंदी उठविण्यासाठीही न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्यावर काय निर्णय येतो, याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी जगताप यांच्या विरोधात लढण्याची त्यांची तयारी कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *