चहापानासाठी २० लाखांचा खर्च; हिवाळी अधिवेशनातील ‘थ्री स्टार’ चहाची जोरदार चर्चा

Khozmaster
2 Min Read

राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतून विस्तव जात नाही. राज्य विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्याचे चांगलेच पडसाद उमटतील. त्याची झलक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या निमित्ताने दिसू शकते. मात्र, यंदा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसाठी ‘थ्री स्टार’ चहापानाची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन इतर अधिवेशनांच्या तुलनेत जरा वादळीच असते. यावर्षीचे चहापान ‘स्पेशल’ आहे. प्रशासनाने तशी जाहिरात प्रकाशित केली आहे. ‘तीन आणि त्यापेक्षा अधिक स्टार,’ असलेल्या हॉटेलकडून त्यांनी चहापानासाठीचे दर मागविले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासनाला २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामात स्वारस्य असणारी हॉटेल त्यापेक्षा जास्त अथवा त्यापेक्षा कमी किंमत नोंदवू शकतात. ज्या हॉटेलने कमी किंमत नोंदविली असेल, त्याला हे काम मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कुठून आले स्टार्स?

गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात चहा-नाश्ता पुरविण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपवली होती, त्यांनी गुणवत्ता पाळली नसल्याचा ठपका प्रशासनाच्या बैठकीत ठेवण्यात आला. ‘चांगला चहा आणि नाश्ता हवा असेल, तर स्टार्स असलेली हॉटेल बघा,’ असा विचार विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत समोर आला. ‘गुणवत्ता आणि दर्जा पाळला जावा, हाच हेतू ठेवून आम्ही तीन किंवा पाच स्टार असलेल्या हॉटेलची सेवा घेऊ इच्छितो,’ अशी प्रतिक्रिया उपायुक्त अनिल बनसोड यांनी व्यक्त केलीपाच वेळचे चहापान

चहापानासाठी २० लाख रुपये हा आकडा डोळे फिरविणारा आहे. हा खर्च केवळ विरोधकांसाठीच्या चहापानापुरता मर्यादित नाही. अधिवेशनाच्या दरम्यान प्रशासन किमान पाच वेळा चहापान करणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर होणारे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे चहापान, विरोधकांसोबत झालेल्या अथवा न झालेल्या चहापानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील चहापान, अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकांत मंत्र्यांसाठी केले जाणारे चहापान. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री व आमदारांसाठीचे चहापान आणि अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या पत्रकार परिषदेतील चहापान यांचा त्यात समावेश आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *