: समृद्धी महामार्गावरील कारली ते कारंजा दरम्यान नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव महिंद्रा झायलोचा टायर फुटून भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये २ जण ठार तर ३ जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासूनच या महामार्गावर मोठे अपघात होत आहेत. विशेषतः वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अपघात होतात. त्यात आता आणखी एका अपघाताची भर पडली असून भरधाव झायलो टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर झायलो गाडी समृद्धी महामार्गाच्या संरक्षक कठड्याला धडकली. ज्यामुळे गाडीतील ५ प्रवाशी बाहेर फेकले गेले. यापैकी एक जण जागीच ठार तर एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात मोहम्मद सलीम हुसेन वय ३५, आरिफ हुसेन वय २८ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तर, चालक मोहम्मद सद्दाम हुसेन वय ३३ वर्ष, अब्दुल जावेद वय २५ वर्ष , मोहम्मद इमाम वय ४२ सर्व रा. वजिराबाद, जिल्हा हैदराबाद हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावर तैनात असलेले १०८ रुग्णवाहिकेचे पायलट अतीश चव्हाण, पायलट विधाता चव्हाण, डॉक्टर सोहेल खान, शेख जाकीर , पायलट गोपाल रोहणकर आणि श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक मेश देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात कारंजा येथे दाखल करण्यात आले. दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आडे यांनी प्रथमोपचार केल्यानंतर गंभीर रुग्णांना अमरावती येथे पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज झालेला अपघात हा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालाय. तर, काही वेळा अतिवेगामुळं अपघात झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्यावतीनं समृद्धी महामार्गावर वाहनं नेण्यापूर्वी टायरची देखील तपासण केली जाते.