वाशिम प्रतिनिधी :
जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी वाशिम पोलिसांकडून सातत्याने धडक मोहिमा राबविण्यात येत आहेत. खिसेकापू व चोरीच्या गुन्ह्यांवर कारवाई करत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने ५० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात यश आले आहे.
कुस्ती सामन्यात चोरी
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी वाशिम जिल्ह्यातील ग्राम शिरपूर येथे जानगिर महाराज यात्रेनिमित्त कुस्ती सामने आयोजित करण्यात आले होते. सामन्याच्या गर्दीचा फायदा घेत एका इसमाच्या खिशातील ५०,००० रुपये चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी Shirpur Police Station येथे अपराध क्र. १०२/२६, कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळा रचून आरोपी ताब्यात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपी अकोला येथील असल्याची माहिती निष्पन्न झाली.
दि. २७/०२/२०२६ रोजी आरोपी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने वाशिमकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथे सापळा रचून अकोला नाका परिसरातून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
त्याचे नाव अब्दुल आरीफ मोहम्मद रसूल (वय २६, रा. जुने शहर, अकोला) असे असून चौकशीत त्याने शिरपूर येथील कुस्ती सामन्यात गर्दीचा फायदा घेऊन ५०,००० रुपये चोरी केल्याची कबुली दिली. चोरी गेलेली संपूर्ण रक्कम त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.
पुढील तपास सुरू
सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी शिरपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने इतर ठिकाणीही चोरी केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक Anuj Tare यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Users Today : 12