नागपूर: तब्बल ६७ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून या पवित्र स्थानी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगाच्या अनेक भागातून बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येईल. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, साडेतीनशे कोटींच्या या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री असताना निधी आधीच मंजूर केला होता. मात्र, काही कारणांनी तो मिळाला नाही. त्यात आता जाण्याची गरज नाही. आता महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात निधी मंजूर केला आहे. त्यामुळे याच्या विकासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारताच्या प्रगतीचा पाया डॉ. आंबेडकरांनी रचला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे केंद्र बनवण्यास राज्यसरकार पूर्ण सहाय्य करेल, असे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले.दीक्षाभूमीवर जागतिक सोयी सुविधांबरोबरच मुंबई इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक करण्याचे काम पूर्ण करण्याचे महायुती सरकारने निश्चित केले आहे. गौतम बुद्धांचा आशिर्वाद राहिल्यास २०२४ च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे काम पूर्ण करत हे स्मारक प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली. यावेळी डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर राज्य सरकारने खरेदी करून त्याठिकाणी त्यांच्या जीवनाशी निगडित साहित्य ठेवले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांची महती जगभरातील नागरिकांना कळणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलेयाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात २२ हजार कोटींचे बौद्ध सर्किट प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. या सर्किटच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांना जोडण्यात आले आहे. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या काळात हे काम पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे योगदान खूप मोठे आहे. दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न उत्तम असून येणाऱ्या काळात जगभरात दीक्षाभूमीचे महत्व आणखी वाढणार असल्याचा विश्वासही गडकरींनी यावेळी व्यक्त केलाकार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यांनी केली. तर संचालन विलास गजघाटे यांनी केले. कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी दीक्षाभूमीच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या २०० कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, थायलंड येथून या सोहळ्यासाठी आलेल्या डॉ. अफिनिता चाइ चाना, स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य सुरई ससाई, सचिव डॉ. राजेंद्र गवई आदी मान्यवर उपस्थित होते..