छत्तीसगडमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. २२ आमदारांबाबत धाडसी पाऊल टाकलं आहे.रायपूर : निवडणूक आयोगानं पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तेलंगाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. छत्तीसगडच्या ९० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्त्वात पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहे. तर, भाजपकडून देखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. भाजपनं काही खासदारांना देखील रिंगणात उतरवलं आहे. रमण सिंग यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसनं देखील यावेळी निवडणुकीसाठी आक्रमक धोरणं अलंबवलं आहे.काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शेवटच्या यादीत काँग्रेसनं ४ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. आतापर्यंत काँग्रेसनं एकूण २२ आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीत ७१ आमदार विजयी झाले होते. त्यापैकी २२ उमेदवारांचं तिकीट कापत काँग्रेसनं धाडसी पाऊल टाकलं आहे.काँग्रेसनं छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३० जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ८ आमदारांना वगळण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५३ उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. यामध्ये १० विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं. तर, रविवारी ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली यामध्ये ४ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलंदरम्यान, काँग्रेसनं राज्यातील सर्व १३ मंत्र्यांना आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. छत्तसीगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २० जागांवर मतदान पार पडेल. उर्वरित ७० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर, ३ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. यावेळी काँग्रेस पुन्हा सत्तेत परतणार की भाजप पाच वर्ष सत्तेबाहेर बसल्यानंतर कमबॅक करणार याकडे लक्ष लागलं आहे.
Users Today : 22