म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : येत्या शनिवारी म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा असली तरी या रात्री चंद्रग्रहण आहे. त्यामुळे दूध अर्थात बासुंदी प्राशन दुसऱ्या दिवशी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.महाराष्ट्रासह देशभरातच कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी होत असते. या रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते व मध्यरात्री १२ वाजता ते प्राशन केले जाते. यानिमित्त ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. यावर्षी २८ तारखेला पौर्णिमा आहे. मात्र, त्याच रात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका, बेल्जियम, थायलंड, पोर्तुगाल, हंगेरी, इजिप्त, इंग्लंड, जपान, चीन या देशांतूनही ते दिसेल. ग्रहण मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजे १२ वाजता दूध प्राशन करता येईल का, असा प्रश्न अनेकांचा आहे. मात्र, महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहण मध्यरात्री १.०५ वाजता लागणार असले तरी ग्रहणाचे वेध शनिवारी दुपारी ३.३० वाजतापासून लागतील. त्यामुळे वेध काळात कोजागरीचे दूध प्राशन करू नये. ग्रहण लागण्यापूर्वी पूजा, दुधाचा नैवेद्य करता येईल. प्रसाद म्हणून पळीभर दूध घ्यावे. बाकी दूध दुसऱ्या दिवशी प्राशन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. पहाटे २.२३ वाजता ग्रहण मोक्ष होईल.
kojagiri purnima 2023: यंदा दूध घोटले जाणार ‘कोजागिरी’च्या दुसऱ्या दिवशी; काय कारण?
या पौर्णिमेला प्राचीन संदर्भ आहेत. वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदान जागर असा कोजागरीचा उल्लेख केला आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशाप्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. यादिवशी बळीराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.गेल्या अनेक वर्षांपासून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर येथे खिरीमधून दम्याचे औषध वितरण करण्यात येते. त्यासाठी देशाच्या विविध भागांतून रुग्ण येथे रांगा लावत असतात. यंदा पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्याने दमा औषध वितरणाचा कार्यक्रम पोद्दारेश्वर राम मंदिर येथे रविवार, २९ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. मंदिराची दारे २८ रोजी सकाळी ११ वाजता बंद होतील व २९ तारखेला सकाळी ७.३० वाजता उघडण्यात येतील, असे विश्वस्त पुनीत पोद्दार यांनी सांगितले.
Leave a comment