पुणे (येरवडा) : येरवडा खुल्या कारागृहातून सोमवारी पळून गेलेला कैदी बुधवारी सकाळी आई-वडिलांसोबत कारागृहात माघारी परतला. कारागृह प्रशासनाने येरवडा पोलिसांना याबाबत माहिती कळविल्यानंतर पळून गेलेल्या कैद्याला ताब्यात घेण्यात आले. तो आपल्या आईला भेटायला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
आशिष भारत जाधव (वय ३७, रा. वडगाव धायरी) असे या कैद्याचे नाव आहे. तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी कैदी पळून गेल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी जाधववर गुन्हा दाखल केला होता.
जाधवच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. आईला भेटण्यासाठी तो कारागृहातून पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज कारागृह प्रशासनाने वर्तविला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाने पोलिसांना कैदी माघारी परतल्याची माहिती दिली. पोलिसांनी कारागृहात येऊन जाधवला ताब्यात घेतले. आशिषची रवानगी मध्यवर्ती कारागृहात
मध्यवर्ती अथवा जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे, सुटका होण्यासाठी काही वर्षे शिल्लक राहिलेले आणि चांगली वर्तणूक असणाऱ्या कैद्यांचे खुल्या कारागृहात स्थलांतर केले जाते. खुल्या वातावरणात राहून एकाला एक दिवस माफी मिळत असल्याने कैद्यांची प्रतीक्षा यादी खूप मोठी असते. आशिष जाधव कारागृहातून पळून गेल्याने त्याची पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार आहे. याशिवाय त्याला प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. ‘कारागृहातून पळून जाणाऱ्या कैद्यांना खुल्या कारागृहाचे दार कायमचे बंद होते,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Users Today : 7