पुणे
पुण्यातील हडपसर परिसरात एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने बुधवारी मध्यरात्री मोठी खळबळ उडाली. टॉयलेट परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील कामधेनू इस्टेट परिसरातील खासगी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात संशयास्पद सर्किट आणि टायमर लावलेली पांढऱ्या रंगाची वस्तू आढळली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात संबंधित वस्तूमध्ये सात तासांचा टायमर लावण्यात आल्याचे समोर आले. टायमरवरील उर्वरित वेळ पाहून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात नाकेबंदी केली. या घटनेमुळे रुग्ण, नातेवाईक, रुग्णालय कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासादरम्यान ही वस्तू ‘लो ग्रेड आयईडी’ प्रकारातील जिवंत बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटकांसोबत सर्किट आणि टायमर यंत्रणा जोडण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संबंधित वस्तू ताब्यात घेऊन हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन सुरक्षितरीत्या निकामी केली.
दरम्यान, ही बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारी संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती इलेक्ट्रिक स्कूटरवरून आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून परिसरातील तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलीस, Pune City Police गुन्हे शाखा आणि Anti-Terrorism Squad यांच्या स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली असून, संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Users Today : 10