नागपूर : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची पाच लाखांहून अधिकची थकबाकी असलेल्या सुमारे ५५४ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कर थकविणाऱ्या २४०० मालमत्ताधारकांची यादीच तयार केली असून या सर्व मालमत्ताधारकांचा पाठपुरावा घेतला जाईल, अशी माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आँचल गोयल यांनी दिली.
गोयल यांनी सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना पात लाखांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी वसूल करून देय रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. तसेच जेथे १ लाख ते ५ लाख रुपयांची रक्कम थकित आहे, तेथे कर वसुली पथकाकडूनसुद्धा वसुली केली जात आहे. सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना १ हजार ३५६ थकबाकीदारांसाठी जारी केलेल्या मालमत्ता कर वसुली वॉरंट अंतर्गत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यवाही पूर्ण करून ५ डिसेंबरपर्यंत २५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ आणि कर आकारणी नियम क्रमांक ४७मधील तरतुदींनुसार, महापालिकेला संबंधित स्थावर मालमत्ता आणि त्या मालमत्तेतील जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आणि जप्त करण्याचा आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्याचा अधिकार आहे, हे विशेष. महापालिकेने काही मालमत्तांची सार्वजनिक लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराच्या उत्पन्नातून ३०० कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २० नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता करापोटी १५० कोटी रुपये महापालिकेच्या निधीत जमा झाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २१ नोव्हेंबरपर्यंत चालू आर्थिक वर्षात ३५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.