सुनील केदारांवरील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबरला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा नेमका काय?

Khozmaster
2 Min Read

नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ सालामध्ये १५२ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. १९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. बँकेच्या रकमेतून २००१-०२मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.पुढे या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला भरण्यात आला. या कंपनीशी निगडित देशभर घोटाळे झाले. यात एकूण चार राज्यांमध्ये एकूण १९ ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्या सगळ्यांमध्येच प्रतिभूती दलाल म्हणून काम करणारे केतन सेठ आरोपी आहेत. हे सगळेच खटले एका ठिकाणी चालवावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर ५ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने तूर्त या खटल्यांची सुनावणी थांबविण्याचे आदेश दिले होते.मात्र, पुढे सर्वोच्च न्यायालयात या आदेशात बदल केले. या खटल्यातील युक्तिवादाची शिल्लक असलेली प्रक्रिया पूर्ण करावी, मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीखेरीज निकाल सुनावला जाऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सर्व पक्षांतर्फे युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी आणि अॅड. देवेन चौहान यांनी केदारांकडून युक्तिवाद केला. याखेरीज चौधरी यांच्याकडून त्यांचे वकील अशोक भांगडे यांनी युक्तिवाद केला. अखेर, या प्रकरणाचा निकाल सुनावण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर २८ नोव्हेंबर रोजी या खटल्याचा निकाल सुनावतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *