नागपूर : ‘सत्तेत असलेल्यांनी समस्या सोडवायच्या असतात. अलीकडे सत्तारुढ नेते समस्या मांडतात. तुम्हाला स्वत:लाच त्या सोडवता येत नाहीत तर सत्तेत कशाला राहता? बाजूला व्हा’, असे हल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चढवला.
तीन दिवसांपूर्वी भुजबळ व वडेट्टीवार एका व्यासपीठावर होते. सोमवारी वडेट्टीवारांनी घूमजाव करत भुजबळांवर तोफ डागली. ‘ओबीसींचे हक्क, न्यायासाठी मी लढणार. परंतु, दोन समाजात दरी निर्माण होईल, तट पडतील अशाप्रकारची टोकाची भूमिका भुजबळ घेत असतील तर, त्यास आमचा विरोध राहील. समर्थन देणार नाही. ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या व्यासपीठावर गेलो होतो. त्यांची भूमिका कुणालाही मान्य होणार नाही. भुजबळ असो की मनोज जरांगे पाटील, त्यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे गावागावांत दोन समाजांत भांडणे झाली, वाद पेटल्यास कोण जबाबदार राहील’, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.ओबीसींच्या भूमिकेबाबत कुणाचा दबाव आहे का, असे विचारले असता, ‘भुजबळ यांनाच विचारा. मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र दिले जात आहे. साप निघून गेल्यावर लाठी आपटण्याचा हा नवीन प्रकार सुरू झाला आहे’, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, ‘भुजबळ यांना सेनापती म्हणालेलो नाही. आमचे सेनापती मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आहेत.’
शरद पवार यांच्याशी भेटण्यापूर्वीही ओबीसींच्या हक्काची भूमिका सातत्याने मांडत आलो आहोत. ते आमच्या पक्षाचे नाही तर, महाराष्ट्राचे आहेत, असे सांगून विजय वडेट्टीवार यांनी पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर भूमिका बदलल्याचा इन्कार केला.