नागपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घर जवळ करायचे आहे; पण विमानभाडे अव्वाच्या सव्वा आहे. प्रयत्न करूनही रेल्वेचे तिकीट मिळाले नाही. ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ दराच्या तिकीट काढण्यासाठी मन तयार होत नाही. अशा वेळी काय करावे? सरळ कार काढावी आणि पुणे, नाशिक वा मुंबईवरून ‘समृद्धी’मार्गे नागपुरात पोहोचावे… असा करून प्रवास करणाऱ्यांची यंदा लक्षणीय संख्या होती. आकडेवारीतच सांगायचे झाल्यास या महामार्गावरून सव्वापाच लाख लहान-मोठ्या चारचाकींनी प्रवास केला. एक ते २१ नोव्हेंबर या काळातील ही आकडेवारी आहे.समृद्धी महामार्गावर दररोज सुमारे ११ ते १३ हजार कार धावतात. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होताच १६ नोव्हेंबरपासून कारची संख्या लक्षणीय वाढली. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दिवसांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सुमारे सव्वालाख कार वाढल्या. एक ते २१ ऑक्टोबरदरम्यान दोन लाख ६५ हजार २८० कारची ये-जा झाली. चालू महिन्यातील याच कालावधीत तब्बल तीन लाख ८२ हजार ४१६ कारनी मार्गक्रमण केले. इतर वाहनांच्या संख्येत फारसा फरक पडला नाही. लहान मालमोटारी, दोन, तीन वा चार ते सहा एक्सलच्या वाहनांची संख्या एक-दीड हजारच्या फरकाने कमी अधिक होती.
पुणे, मुंबई, अमरावती, अकोला, वर्धा अशा प्रमुख शहरांसाठी चाकरमाने आणि व्यापाऱ्यांनी समृद्धी महामार्गाला प्राधान्य दिले. एरवी काही किलोमीटरपर्यंत अन्य कोणतीही गाडीही दिसत नसल्याची तक्रार असते. या दिवाळीच्या दिवसांत मात्र सर्वच गाड्याच गाड्या दिसत होत्या, असा अनुभव अनेकांनी सांगितला. पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांनी पुणे ते समृद्धीपर्यंतचा प्रवास वाहतूक वारंवार ठप्प होत असल्याने त्रासदायक ठरल्याचेही सांगितले.लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी आणि…
लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस; शनिवारी समृद्धी महामार्गावरून तब्बल २३ हजार ३४० कार धावल्या; तसेच दिवाळी झाल्यानंतर शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी कर्मभूमीवर परतण्यावर अनेकांनी भर दिला. शनिवारी प्रवास करून पोहोचायचे. रविवारी आराम करायचा आणि सोमवारपासून ऑफिस सुरू, असे हे नियोजन होते. त्यामुळेच १८ तारखेला समृद्धीवरून ३० हजार ५४३ कार धावल्या. एका दिवसाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या असावी असा अंदाज आहे.