नाशिक : मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निरोप समारंभात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या कर्तव्यातील भूमिकेसह माणुसकी व वडिलकीच्या आठवणी मांडल्या. अखेरीस शिंदे हे व्यक्त होण्यास उभे राहिले अन् सहकाऱ्यांच्या भावनांनी गहिवरलेल्या आयुक्तांनी हुंदका दिला. काही वेळ डोळे मिटून शांत होत त्यांनी सभागृहात उपस्थित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर मन मोकळं केलं. पण, या प्रसंगामुळे सभागृहातील सारेच अधिकारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, हे गहिवरणे बदलीमुळे नव्हे तर नाशिकशी जुळलेल्या ऋणानुबंधामुळे निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक कारवायांची भूमिका
‘ग्रामीण भागात माझे बालपण गेले. मी शेतकऱ्याच्या मुलगा आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती जवळून न्याहाळण्याची सवय आहे. गावी माझा एक मित्र मटक्याच्या अड्ड्यावर काम करायचा. त्याचे आणि गावातील इतरांचे त्यामुळे भले झाले नाही. त्यामुळे जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांबाबत कारवाई करण्याची माझी भूमिका असायची. प्रत्येक ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर प्रतिबंधात्मक कारवाईकडे माझे लक्ष असते. सोलापूर शहरात नियुक्तीस असताना तिथे तोच मित्र ऑनलाइन जुगारात कार्यरत असल्याचे कळाले. त्याला माझी भूमिका सांगितल्यावर त्यानेही ते कृत्य बंद केले. पोलिस हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मी यापूर्वीही अनेक चॅलेंजिंग पोस्टिंग स्वीकारल्या आहेत. सर्वजण प्रामाणिकपणे काम करीत आहात, यापुढेही करत रहा’, अशा शब्दांत आयुक्त शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Users Today : 8