पारनेर (प्रतिनिधी ): पारनेर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले आणि सुमारे वीस वर्षांपासून शिवसेनेचे संघटन करत असलेले साहेबराव सखाराम खरमाळे यांची पक्षाने दखल घेत त्यांची पारनेर तालुका शिवसेना (शिंदे गट )उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील भांडगाव येथील रहिवाशी असलेले साहेबराव खरमाळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे इमाने – इतबारे काम करत आहेत. स्पष्टवक्ते, धाडसी अशा स्वभावाच्या श्री. साहेबराव खरमाळे यांनी भांडगावं, भाळवनी तसेच पारनेर तालुक्यामध्ये पक्षाचे उत्तम संघटन केले आहे. लहान थोर, अबालवृद्धांचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री. खरमाळे नेहमी धडपड करत असतात. त्यांचबरोबर त्यांनी आपल्या शेतात गोशाळेची स्थापना करून अनेक गावरान वंश जतन करण्याचे काम केले आहे. शासकीय पातळीवरून कुठल्याही प्रकारचा निधी नसताना स्वखर्चाने श्री. खरमाळे यांनी गावरान गायीचे सांभाळ केला होता. राजकारण करत असताना सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या खरमाळे यांचा वाचनालय तसेच वृद्धाश्रम स्थापन करण्याचा मानस आहे. एका छोट्या गावातील व्यक्तीचे तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अहमदनगर दक्षिणचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि नगरचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक श्री. अनिल शिंदे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रयत्न तसेच समाजातील शोषित, वंचित, पीडित घटकांच्या समस्या सोडविणार असल्याच्या भावना नवनियुक्त शिवसेना तालुका उप प्रमुख साहेबराव खरमाळे यांनी व्यक्त केल्या.