मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपिमध्ये ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून महापालिकेची धडक कारवाई सुरू होणार आहे. कारवाईसाठी पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज केले आहे.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व अधिनियम २०२२च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क च्या तरतूदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपिमध्ये ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. मराठी पाट्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवर (एस) सिव्हील क्र.(५) ७७५/२०२२ २५ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शनिवारी (दि. २५) संपल्याने पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.