नागपूर : उत्तर नागपूरसह शहराचा ग्रामीण परिसर व मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांची सोय व्हावी यासाठी इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करून ६१५ खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने हे रुग्णालय इतरत्र हलविण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप करीत तत्काळ भूमिपूजन करण्याची मागणी रविवारी झालेल्या जनआंदोलनात करण्यात आली.संविधानदिनी कामठी रोड येथील रुग्णालयासमोर कृती समितीतर्फे बेमुदत जनआंदोलन सुरू झाले आहे. माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात येथे ६१५ खाटांच्या रुग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र अजून या प्रकल्पाचे भूमिपूजन झालेले नाही, असे राऊत म्हणाले. हे रुग्णालय मिहानमध्ये नेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वेदप्रकाश आर्य यांनी यावेळी केला. जोवर भूमिपजून होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असे माजी उपमहापौर धीरेंद्र चहांदे यांनी जाहीर केले.यावेळी भदंत पयांसिरी, माजी नगरसेवक मुरली मेश्राम, छाया खोब्रागडे, संकेत बुरबुरे, मूलचंद मेहर, त्रिशरण सहारे, बाबूखान, ताराचंद खांडेकर,पांडुरंग हिरवाडे, महेंद्र भांगे उपस्थित होते.