अहमदनगर : पारनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गारपीट झाल्याने फळबागा उद्ध्वस्त झाल्या, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले, कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला. तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत नुकसानीची अस्वस्थ करणारी माहिती पुढे येत होती. त्यामुळे आमदार लंके यांनी भल्या सकाळीच पाहणी दौरा सुरू केला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला.
गारपीट झाल्यानंतर रविवारी सायंकाळीच आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती देत नुकसानभरपाईची मागणी केली. त्यांनी म्हटले आहे की, पारनेर, पानोली, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.पारनेर-नगर मतदार संघातील गावांमध्ये जुन-जुलै व ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे एक पीक वाया गेले होते. त्यानंतर काही गावांमध्ये झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. ही पिके आता हाताशी आलेली असतानाच या अवकाळी वादळी पावसामुळे व गारपीटीमुळे ही पिकेही वायाला गेली आहेत. पीकांबरोबरच फळबागा, रब्बी व नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.गारपीट व अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश सबंधित विभागास देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. सोबतच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी गणेश राठोड, तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनाही पत्र पाठऊन आमदार लंके यांनी त्यांचेही लक्ष वेधले आहे.