सोलापूर: देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री असताना अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य केंद्राची म्हणजेच मिलेट सेंटरची घोषणा केली होती.जवळपास २०० कोटींचा प्रकल्प होता.मात्र हा प्रकल्प आता बारामतीला जाणार असल्याचा शासन निर्णय कृषी मंत्रालयाकडून २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे.सोलापूरच्या हक्काचा प्रकल्प बारामतीला जाणार असल्याने सोलापुरात सर्वस्तरातून विरोध सुरू झाला आहे.रविवारी अजित पवार यांनी बारामतीत असताना माध्यमांसोबत बोलताना सोलापुरातील कोणत्याही प्रकारचा प्रकल्प बारामतीला जाणार नसल्याचे जाहीर केले. सोलापुरातील शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी कृषी मंत्रालयाने जाहीर केलेले शासन निर्णय दाखवले आहे.अजित पवार हे धादांत खोटं बोलत आहेत,असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे.
सोलापुरातील राजकीय नेत्यांची उदासीनता
सोलापूरमधून हा प्रकल्प जात असेल तर दुर्दैवाची बाब आहे, असं प्रशांत बाबर म्हणाले. भाजपच्या नेते त्यांच्या नेत्यानं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं केंद्र वाचवू शकत नाहीत, अशी टीका बाबर यांनी केली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार आणि दोन खासदार असताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर अन्याय केला जातो आहे. सोलापुरात बेकारी वाढली आहे.अनेक तरुण तरुणी हे रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत. सोलापूरला भाजप आमदरांनी आणि खासदारांनी वेगवेगळे प्रकल्प आणण्याऐवजी येथील प्रकल्प बाहेर जात आहेत.ही राजकीय नेत्यांची उदासीनता आहे.भविष्यात आम्ही सोलापूरच्या भविष्यासाठी मोठं रान उठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी दिली आहे.सोलापूरमधून हा प्रकल्प जाऊ देणार नाही. वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प दिला असला तरी ते गप्प आहेत. आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी या संदर्भात आवाज उठवणार आहेत, असं प्रशांत बाबर म्हणाले.