सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी .
येथील पंचायत समिती कार्यालयात १o नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आत्माराम नवघरे यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचा 50 ग्रॅम वजनाचा गोफ जबरीने चोरून नेल्याप्रकरणी मालेगाव येथील शासकीय ठेकेदार गणेश वर्मा याला मालेगाव पोस्ट पोलिसांनी अजूनही अटक केली नसल्यामुळे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी २५ नोव्हेंबर रोजी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाणेदार चौधरी यांची भेट घेतली . यावेळी त्यांनी शासन दरबारी तडीपार घोषीत असलेला व अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी गणेश वर्मा हा अजुनही मोकाट फिरत असुन १५ दिवस उलटुनही त्याला अटक का करण्यात आली नाही ? असा प्रश्न करुन आरोपीला तात्काळ अटक करून करावी अशी आग्रही मागणी केली .
घटनेच्या हकीकती नुसार 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मालेगाव येथील ठेकेदार गणेश वर्मा हा पंचायत समितीमध्ये आला आणि एकांबा येथील ग्राम विकास अधिकारी तथा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांना तू एकांबा गावातील माझी कामे ग्रामसभा घेऊन का बंद केली . असे म्हणुन त्यांना मारहाण केली . तसेच त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम सोन्याची चेन जबरीने चोरून नेली तसेच गावातील कामाच्या फाईल सुद्धा हिसकावून घेऊन पळून गेला. अशा आशयाच्या फिर्यादी वरून आरोपी गणेश वर्मा याचेवर कलम 353 332 504 506 394 भादविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या प्रकरणात अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. सदर आरोपी विरुद्ध मालेगाव न्यायालयात अनेक गुन्हे दाखल असून दोन गुन्ह्यांमध्ये त्याला मालेगाव न्यायालयाने सजा सुद्धा सुनावली असुन प्रकरण वरीष्ठ न्यायालयात दाखल आहे . बहुतेक प्रकरणे सरकार विरुद्ध गणेश वर्मा असेच आहेत .तसेच इतरही काही व्यक्तींचे वैयक्तिक गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत. इतके मोठे गुन्हे दाखल असलेला व सरकार दरबारी सरकार दप्तरी तडीपार म्हणून असलेला आरोपी गणेश वर्मा हा आजपर्यंत पोलिसांना कसा सापडला नाही ? असा प्रश्न यावेळी ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजीव निकम यांनी उपस्थित केला . त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर गजाआड करा अन्यथा ग्रामसेवक संघटना संपुर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन करेल . असा इशाराही यावेळी निकम यांनी दिला .
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम ,जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष के डी पाटील , राकेश कोटकर , जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील नवघरे , संजीव बेदरे ,सुरेश गावंडे पाटील , परसराम मोरे, निवास पांडे व चंदू पाटील आदी ग्रामसेवक उपस्थित होते.