‘त्यांना’ पराभवाची भीती, जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा; आरक्षणावरुन आंबेडकरांवरही पलटवार

Khozmaster
3 Min Read

नाशिक : महाराष्ट्रातील भाजपची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असली तरी, दिल्लीतील श्रेष्ठींचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे अशा बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विभागनिहाय विधानसभेतील पराभवाचा अंदाज घेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. किती जागा पडणार आहेत, याचा ते आढावा घेत असून फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासाठी हा संदेश असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. प्रकाश आंबेडकर यांनी निष्कर्ष काढून गैरसमज करू नये, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यासह प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु, या एन्काउंटरबाबत वेगवेगळी माहिती दिली जात आहे. ज्या संस्थेत केले त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल उपस्थित करीत, गाडीत बसून त्याचा एन्काउंटर करायची गरज होती, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी आरोप केला म्हणजे तसे नसते. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील स्वतंत्रपणाने आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडत आहेत. सरकार त्या बाबतीत लवकर निर्णय घेत नाही. जरांगेंचे आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाचे, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे. कोण कोणाच्या जवळ आहे असे निष्कर्ष काढून गैरसमज करणे चुकीचे आहे. ते त्यांच्या जीवावर आंदोलन करीत आहेत, असे ते म्हणाले.

‘मंत्रिमंडळ बैठकीत टोकाची भांडणे’

भारतीय जनता पार्टीच्या जे जवळ जातात त्यांना सगळे माफ असते. मात्र, त्यांच्याविरोधात गेलात, की ती लोक तुमच्या विरोधात बोलायला लागतात, अशी टीका करीत पाटील यांनी एकनाथ खडसेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील खडाजंगीवरही पाटील यांनी भाष्य केले. आता सरकारची तिजोरी साफ झाली असून, अर्थमंत्री अनेक प्रस्ताव नाकारत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत टोकाची भांडणे होत असून, प्रत्येक आठवड्याला भांडणेच होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

गोकुळ झिरवाळांनी मागितली उमेदवारी

गोकुळ झिरवाळचा मी बाप असल्याचे सांगत, तो माझ्या परवानगीशिवाय कुठेही जाणार नाही, असा दावा विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केला होता. मात्र, गोकुळ झिरवाळ यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारले असता, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे, असा अर्थ होत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या प्रवेशाची चर्चा झाली नसून, संपर्कही झालेला नाही. परंतु, गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरीतून उमेदवारीसाठी अर्ज केल्याचा दावा करताना, आमचा उमेदवार मात्र ठरलेला नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. नरेंद्र दराडे आणि माझी घाईत भेट झाली असली तरी, ती केवळ नजरानजर असल्याचा खुलासाही पाटील यांनी केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *