शरद पवारांची यात्रा नाशकात, बॅनरची एकच चर्चा; चार पक्ष फिरलेल्या दादांच्या आमदाराला पाडणार?

Khozmaster
3 Min Read

नाशिक: लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणारे शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी आता पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यात असणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध मतदारसंघात जाहीर सभा पार पडणार आहेत.शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ठिकठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवरील मजकूर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख गद्दार म्हणून करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडली. बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचा उल्लेख गद्दार म्हणून करत आलेला आहे. आता पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवार गटासाठी तोच शब्द वापरला आहे.नाशिकमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत आहेत. या बॅनरवर शरद पवार, जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंचे फोटो ठळकपणे दिसत आहेत. ‘स्वाभिमानी मनगटांचा एकच घाव संपवूया गद्दारीचा लपंडाव’, अशा आशयाचे बॅनर शरद पवार गटाकडून लावण्यात आलेले आहेत. या माध्यमातून अजित पवार गटाला अप्रत्यक्षपणे गद्दार म्हणण्यात आलं आहे.
ज्या ठिकाणी शरद पवार गटाची सभा होणार आहे, त्या सभागृहाच्या बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहेत. नाशिक शहरात राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेसाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या बॅनरवर गद्दार म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. २५ सप्टेंबरला शरद पवार गटाची जाहीर सभा सिन्नर-शिर्डी हायवेवर ज्वाला माता लॉन्सवर होईल.माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार आहेत. ते सध्या अजित पवार गटात आहेत. कोकाटेंनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केल्यावर ते त्यांच्या पक्षात आले. राष्ट्रवादीनं १९९९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. कोकाटेंनी शिवसेनेची वाट धरली. सेनेकडून लढत ते आमदार झाले. १९९९ आणि २००४ मध्ये त्यांनी सेनेच्या तिकिटावर लढत आमदारकी जिंकली.नारायण राणेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कोकाटेंनी त्यांना साथ दिली. ते राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले. २००९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. २०१४ मध्ये ते भाजपमध्ये गेले. पण सेनेच्या राजाभाऊ वाजेंनी त्यांचा विधानसभेला पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली. त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. अतिशय कमी मताधिक्क्यानं ते निवडून आले. २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड केलं. त्या बंडात कोकाटेंनी अजित पवारांना साथ दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *