सतिश मवाळ
मेहकर येथील श्री नरसिंह संस्थानमध्ये २७ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर ४५४ वा कुरवंडीचा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला चारशे चौपन्न वर्षांची परंपरा आहे. संस्थानचे अध्यक्ष तथा पीठाधिश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी दीपोत्सव संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे सकाळी पाच वाजता शेकडो भाविकांनी सामुहिक काकडा आरती केली. त्यानंतर परंपरेनुसार एकावर एक सात डेगी रचून दीपोत्सव साजरा करण्यात आला. इलेक्ट्रिक दिवे मालवून मंदिरात सर्वत्र तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. वं.आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज आणि वं.बाळाभाऊ महाराज पितळे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर सर्व भाविकांना काल्याच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भारतीय संस्कृतीमध्ये कार्तिक पौर्णिमेला कुरवंडी करून दीपोत्सव साजरा करण्याचे महत्त्व असल्याने सर्व प्रमुख मंदिरांमध्ये हा कार्यक्रम उत्साहाने केल्या जात असतो. श्री नरसिंह संस्थान व लक्ष्मीनृसिंह बहु. सेवामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमासाठी पवन ओव्हर, गणेश डुरे, कार्तिक घुगे, गणेश शेळके, सिध्देश्वर कौटकर, मितेश नवले, राम शिंदे, यश घुगे, हिंमत आसोले, यज्ञेश पितळे, सतिष जावळे आदींनी परिश्रम घेतले.