नागपूर: मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या रकमेसाठी वृद्ध माता पित्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. आपण मृत व्यक्तीचे पालक असून निराधार आहोत तरीसुद्धा मोटार अपघात दावा प्राधिकरणाने आपल्या तुलनेत सुनेला अधिक रक्कम दिल्याचा दावा या पालकांनी केला आहे. यावर न्यायालयाने एचडीएफसी ईआरजीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला आणि याचिकाकर्त्यांच्या सुनेला नोटीस बजावली आहे. तसेच तोवर सुनेला खात्यातून पैसे काढण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे.
रमेश (६३) आणि त्यांच्या पत्नी रमा (५७, दोघांची नावे बदललेली) यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, त्यांचा मुलगा राम याचा १७ जून २०१७ रोजी नवी दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. पुढे कुटुंबीयांनी मोटार अपघात दावा प्राधिकरण, नागपूर येथे याचिका दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. रामचे पालक, पत्नी रश्मी (वय ३३, नाव बदललेले) आणि भाऊ श्याम (वय २३) या तिघांनी हा दावा केला होता. नुकसान भरपाई मंजूर करताना, प्राधिकरणाने निरीक्षण नोंदविले की केले की रामचा लहान भाऊ श्याम हा कमाविता आहे. त्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्याची गरज नाही.रामच्या आई, वडील व पत्नी यांना भरपाई मंजूर करण्यात आली. प्राधिकरणाने रामच्या पत्नीला ४५ लाख ९७ हजार रुपये आणि आई वडिलांना सासू प्रत्येकी सात लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. आई वडिलांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. वृषाली जोशी यांनी या प्रकरणी नोटीस बजावित पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. राजू कडू यांनी बाजू मांडली.
पत्नीने केले दुसरे लग्न
याचिकेनुसार, राम व रश्मीला मूल नव्हते. रामचा १७ जून २०१७ रोजी अपघाती मृत्यू झाल्यानंतर काहीच दिवसांत रश्मी तिच्या माहेरी परतली. दरम्यान ४ जून २०२१ रोजी तिने दुसरे लग्नही केले. तिच्यावर कुणीही अवलंबून नाही. दुसरीकडे, आम्ही वृद्ध आहोत आणि आमच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. आम्हाला नुकसान भरपाईची अधिक पैशांची गरज असल्याचा दावा आई-वडिलांनी केला आहे.