पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळात राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदार संघात दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मावळ लोकसभेवर राष्ट्रवादीचाच खासदार निवडून येणार असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तळेगाव दाभाडे येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर देखील भाष्य केले आहे. सध्या मावळच्या जागेवर एकनाथ शिंदे समर्थक श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत.
लोकसभा जागा वाटपावरुन महायुतीत पेच
लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी महायुतीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत संभ्रम आहे. भाजप २६ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढवेल, अशा चर्चा सुरु होत्या. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटप झालं नसून २६/२२ जागा वाटपाच्या चर्चेचा आधार असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळं आगामी काळात महायुतीमधील जागा वाटपाचा पेच कसा सुटणार याकडे लक्ष लागलं आहे.
Users Today : 20