रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाला लेकीचा अनोखा सलाम,स्वत:च्या लग्नाला वऱ्हाडासह चक्क रिक्षातून दाखल, कारण…

Khozmaster
2 Min Read

सातारा : लेकीचं लग्न ही कुटुंबासाठी आणि तिच्या वडिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातारा शहराजवळील गोडोलीमधील राजेवाडीतील विजय खामकर हे रिक्षा चालवतात. खामकर यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून पार पाडला. त्यांची लेक सायली खामकर हिचा विवाह सांगवड (ता. पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी झाला. हा विवाहसोहळा एका गोष्टीमुळं चर्चेत राहणारा ठरला. कारण या लग्नासाठी जमलेले वऱ्हाडी चक्क रिक्षातून विवाहस्थळी दाखल झाले.

सायली खामकर हिनं रिक्षा चालवून कुटुंब चालवणाऱ्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीनं सलाम केला आहे. सायलीनं तिच्या लग्नाचं वऱ्हाडही रिक्षातून नेण्यासाठी हट्ट धरला. वडिलांनी देखील लेकीचा हट्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आणि तो पार पाडला. यासाठी त्यांना देगाव येथील पाटेश्वर रिक्षा संघटनेची मदत झाली. या संघटनेतील रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षा लग्नानिमित्त सजवून वऱ्हाडी मंडळींच्या प्रवासासाठी सज्ज ठेवल्या. राजेवाडी ते सातारा येथील मंगल कार्यालयापर्यंत वऱ्हाडी मंडळी रिक्षातून दाखल झाली.

राजेवाडीतील बहूतेक जण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. विजय खामकर हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांची कन्या सायली हिनं रिक्षा व्यवसायातून कुटुंबाला स्थैर्य, सुबत्ता लाभली. या भावनेतूनच लग्नाला येणारी वऱ्हाडी मंडळी रिक्षातून न्यायचा आग्रह धरला. यातून तिने आपल्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीने सलाम केला. सायली खामकर हिच्या लग्नासाठी १५ ते २० रिक्षांतून ही वऱ्हाडी मंडळी साताऱ्यातील मंगल कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळाली.

सातारकर सजवलेल्या रिक्षा पाहून काही काळासाठी अचंबित

साताऱ्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने सजविलेल्या रिक्षांचा ताफा बघून ये- जा करणारेही बुचकळ्यात पडले. यामागची पार्श्वभूमी समजताच साऱ्यांनीच सायलीचे, तिच्या वडिलांचे तसेच आई नीता, भाऊ हर्षद, शुभम आदींचे कौतुक केले. या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक यांच्या दृष्टीनेही हा विवाह सोहळाही अनोखा ठरला. सायली खामकरचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. आपण दुसऱ्या कोणत्याही गाडीने न जाता स्वतःचा वडिलांच्या रिक्षामधून जावं हा क्षण सर्वांसाठी आनंदाचा आणि गर्वाचा होता.सायलीचे वडील विजय खामकर म्हणाले की,मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणे, यातच त्यांच्या कष्टाचे चीज दडलं आहे. सायलीचं शिक्षण पदवीपर्यंत झाले. तिच्यावर केलेल्या संस्काराचा हा परिपाठ असल्याचं तिने दाखवून दिले. आम्हाला तिचा अभिमान वाटतो, असं ते म्हणाले.

0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *