धुळे
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले असून शनी अमावस्येच्या रात्री एका भोंदू बाबाने विवाहित महिला आणि तिच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी आरोपी भोंदू योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील वर्धाने शिवारात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. जयश्री काकुस्ते (वय २५) या फायनान्स कंपनीमध्ये डेली कलेक्शनचे काम करत होत्या. त्या पूजा करण्यासाठी जैताणे परिसरातील भोंदू बाबा योगेश खैरनार यांच्या आश्रमात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे योगेश खैरनार याला ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली.
अत्याचाराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा आटोपल्यानंतर जयश्री यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्री यांनी जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा सुरू केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.
या घटनेवेळी जयश्री यांच्यासोबत आलेला अक्षय सोनवणे हा तरुण देखील आरोपीच्या हालचालींचा साक्षीदार ठरत असल्याने आरोपीने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचाही खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
नारंगी रुमालामुळे उलगडले रहस्य
शनी अमावस्येच्या रात्री जयश्री आणि अक्षय हे पूजा करण्यासाठी आश्रमात गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रायपूर-भडगाव रस्त्यावर जयश्री यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र घटनास्थळी संशयास्पद परिस्थिती दिसून आल्याने तपास अधिक खोलवर करण्यात आला.
दरम्यान जंगल परिसरात एका तरुणाचा मृतदेह दफन केलेल्या अवस्थेत आढळून आला. तो मृतदेह अक्षय सोनवणे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेला नारंगी रंगाचा रुमाल तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला.
पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेत रुमालाचा वास दिल्यानंतर श्वान थेट आरोपी योगेश खैरनारच्या आश्रमापर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
बैलगाडीने मृतदेह जंगलात नेल्याचा संशय
पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळील उभानार्डी जंगल परिसरात दफन केला होता. मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी बैलगाडीच्या चाकांचे ठसे आढळून आल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, निजामपूर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीच्या इतर कारवायांचाही शोध घेतला जात आहे.
Users Today : 34