आळंदी, ता. १ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य अष्टमी (ता. ५) ते कार्तिक वद्य अमावस्या (ता. १२) या कालावधित होणार आहे. गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची सुरुवात मंगळवारी (ता. ५) होणार असून कार्तिकी एकादशी शनिवारी (ता. ९) तर मुख्य संजीवन समाधी सोहळा सोमवारी (ता. ११) होणार आहे. या निमित्ताने देऊळवाड्यात परंपरेने कीर्तन, प्रवचन आणि जागरचे कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी (ता. ५) पहाटे तीन ते पाच पवमान अभिषेक व दुधारती होईल. सकाळी सात ते नऊ गुरू हैबतबाबा पायरी पूजन पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते होईल. सायंकाळी सहा ते आठ वीणा मंडपात योगीराज ठाकूर यांच्या तर्फे कीर्तन, रात्री नऊ ते अकरा वीणा मंडपात बाबासाहेब आजरेकर यांच्या तर्फे कीर्तन, रात्री दहा ते बारा हैबतबाबा पायरीपुढे वासकर महाराज यांच्या वतीने रात्री बारा ते दोन मारुतीबुवा कराडकर आणि रात्री दोन ते चार आरफळकर यांच्या वतीने जागर होईल.
बुधवारी (ता. ६) पहाटे तीन ते पाच पवमान, अभिषेक दुधारती होईल. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वीणा मंडपात बाबासाहेब देहूकर यांच्यातर्फे कीर्तन, रात्री साडे नऊ ते अकरा वीणा मंडपात हभप वासकर महाराजांतर्फे कीर्तन होईल.
कार्तिक वद्य दशमी गुरुवारी (ता. ७) पहाटे तीन ते पाच पवमान अभिषेक व दुधारती होईल. सायंकाळी साडे चार ते साडे सहा गंगूकाका शिरवळकर यांच्यातर्फे कीर्तन, सायंकाळी साडे सहा ते साडेआठ वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रेंतर्फे कीर्तन, रात्री नऊ ते अकरा माऊलींची पालखी मंदिर प्रदक्षिणा, रात्री नऊ ते अकरा वासकर महाराज कीर्तन वीणा मंडपात, रात्री साडे अकरा ते साडेबारा वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागर होईल.
कार्तिक वद्य एकादशी शुक्रवारी (ता. ८) पहाटे तीन ते पाच पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी साडे चार ते सायंकाळी साडे सहा वाजता वीणा मंडपामध्ये गंगूकाका शिरवळकरतर्फे कीर्तन, रात्री नऊ ते अकरा वीणा मंडपात वासकर महाराजांतर्फे कीर्तन, रात्री साडे अकरा ते साडे बारा वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागर होईल.
कार्तिक वद्य भागवत एकादशी शनिवारी (ता. ९) मध्य रात्री साडे बारा ते पहाटे दोन माऊलींच्या समाधीवर अकरा ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान अभिषेक व दुधारती होईल. या वेळी भाविकांची दर्शनबारी बंद राहील. एकादशीमुळे भाविकांच्यावतीने होणाऱ्या महापूजा बंद असतील. दुपारी एक वाजता माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर पडेल. रात्री बारा ते दोन मोझे यांच्या वतीने जागर होईल.
कार्तिक वद्य द्वादशी रविवारी (ता. १०) पहाटे दोन ते साडे तीन समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती, पहाटे साडे तीन ते चार प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचोपचार पूजा होईल.
दुपारी चार ते सात माऊलींची पालखी देऊळ वाड्याबाहेर रथोत्सवासाठी बाहेर पडून नगर प्रदक्षिणा केली जाईल. दुपारी चार ते सहा वीणा मंडपात हरिभाऊ बडवे यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री नऊ ते अकरा वीणा मंडपात केंदूरकर महाराजांचे कीर्तन होईल. रात्री अकरा ते बारा खिरापत पूजा, फडकरी मानकरी सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटपचा कार्यक्रम होईल.संजीवन समाधी दिनानिमित्त घंटानाद
कार्तिक वद्य त्रयोदशी सोमवारी (ता. ११) पहाटे तीन ते चार देवस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी सात ते नऊ हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे कीर्तन, तर सकाळी सात ते नऊ वीणा मंडपामध्ये संस्थानच्यावतीने कीर्तन, सकाळी सात ते नऊ भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन, सकाळी नऊ ते बारा नामदास महाराज यांचे वीणा मंडपात समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा संजीवन समाधी दिनानिमित्ताने समाधीपुढे घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती, मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जाईल. सायंकाळी साडे सहा ते रात्री साडे आठपर्यंत वीणा मंडपात सोपान काका देहूकर यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री साडे आठ ते नऊ धुपारती, रात्री साडे नऊ ते साडे अकरा कारंजा मंडपामध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांच्यावतीने भजनसेवा, रात्री बारा ते चार हैबतरावबाबा आरफळकर यांचे वतीने जागर होणार आहे. कार्तिक अमावस्या मंगळवारी (ता. १२) दुपारी
चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोझे यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री साडे नऊ ते साडे बारा श्रींचा छबिना मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होईल.
देऊळवाड्यात कार्तिक वारीची लगबग
Leave a comment