जुन्नरमधील दोन हजार हेक्टरला फटका

Khozmaster
2 Min Read

नारायणगाव, ता.१ : जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भाजीपाला व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील २ हजार २११ हेक्टर क्षेत्रातील पिकांना बसला आहे.

सर्वाधिक नुकसान आदिवासी भागातील भात पिके, मध्य व पूर्व भागातील द्राक्ष बागा, कांदा रोपे, नुकताच लागवड केलेला कांदा, चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा पिकांचे झाले आहे. येत्या मंगळवारपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.
तालुक्यात रविवारी (ता.२६) सायंकाळी अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाली. मध्य व पूर्व भागात सरासरी ४० मिलिमीटर पाऊस झाला. आदिवासी भागात ४५ ते ५५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. आदिवासी भागात काढून ठेवलेली भात पिके व काढणी सुरू असलेल्या भात पिकांचे भिजून नुकसान झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांनाही बसला आहे.आमदार अतुल बेनके यांनी सोमवारी पाहणी दौरा करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार गाव कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी मंडलनिहाय पथके तयार करून बाधित शेती पिकांची प्राथमिक पाहणी केली. तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषी अधिकारी भोसले यांनी स्वतः गुंजाळवाडी, गोळेगाव भागात द्राक्ष बागांची पाहणी केली.याबाबत तालुका कृषी अधिकारी भोसले म्हणाले की, बागांचे दृश्य स्वरूपात नुकसान दिसत नसले तरी पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. काही भागात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षमणी काळे पडले आहेत. पुढील आठ दिवसात द्राक्ष बागांवर झालेला दृश्य परिणाम दिसून येईल.

अवकाळी पावसामुळे अडचणीत असलेला शेतकरी अजून अडचणीत आला आहे. पंचनाम्यापासून नुकसान झालेली पिके वंचित राहणार नाहीत. याची काळजी घेण्याचे व तातडीने अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांनी जागृत राहून पिकाचे पंचनामे करून घ्यावेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे व मी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी केली आहे.
– अतुल बेनके, आमदार

नवीन नियमानुसार फळ पिकांना तीन हेक्टर पर्यंत हेक्टरी २२ हजार ५०० रुपये तर कोरडवाहू पिकांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान देण्यात येते. तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाला सादर करण्यात येतील.
– गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर

0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *