Nagpur: मेडिकलच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे थाटात उद्‍घाटन

Khozmaster
3 Min Read

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्यासाठी मेडिकलसारख्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अग्रणी भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर येथे केले.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवी सोहळ्यात त्या बोलत होत्या. शुक्रवारी येथील क्रीडांगणावर या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस होते. अमृत महोत्सवी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अधिष्ठाता डॉ. राज गजभिये हेही यावेळी उपस्थित होते.

नव्या वाटांसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेची गरज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांच्या हेल्थ रेकॉर्ड तसेच आरोग्याच्या नोंदी डिजिटल माध्यमातून नोंदवण्यात येत आहेत ही केंद्र शासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे. १९४७ मध्ये स्थापन झालेल्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणारे डॉक्टर तयार झाले आहेत. ही मेडिकलची जमेची बाजू आहे.

येथील माजी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रावर आपली छाप सोडली आहे हे सांगताना मेडिकलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रकाश आमटे यांचा नामोल्लेख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या मेडिकलचे देशपातळीवरील वैद्यकीय सेवेतील योगदान मोठे आहे. ३० विषयात पदव्युत्तर शिक्षण, सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम येथे आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच तेलंगण राज्यातून रुग्ण वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी येथे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्याच्या क्षेत्रात आजही काही प्रमाणात असमानता दिसून येत असल्याची भावना व्यक्त करीत यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने विमा आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनांचा मोठा आधार गरिबांना मिळाला आहे, असे त्या म्हणाल्या. चरक, सुश्रूत तसेच धन्वंतरीसारख्या उपचार पद्धती आमच्या आरोग्यदायी परंपरा आहेत.

ज्ञान धैर्य आणि सेवा हे ब्रीद मेडिकलसारख्या संस्थांनी जोपासावे आणि गरिबांना आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थिनी दिवंगत डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लेक्चर हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाले. विशेष टपाल तिकिटाचे विमोचन तसेच संस्थेचा ७५ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या स्मरणिकेचे आणि कॉफीटेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपतींनी केले. प्रास्ताविक डॉ. राज गजभिये यांनी मानले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

अवयवदानाबाबत जागरूकतेची गरज

जनतेमध्ये अवयदानाबाबत जागृती व्हावी यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मन लावून काम करावे असे आवाहन करतानाच डॉक्टर हे देवाचे रुप आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनोसारख्या महामारीवर विजय मिळवण्यात आरोग्य यंत्रणेची मोठी मदत झाली. यावरून आरोग्य सेवेचे महत्त्व कळून येते, असे मुर्मू म्हणाल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *