गड-ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त

Khozmaster
2 Min Read

ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त
विभागीय आयुक्तांचा आदेश : सदस्यांची निम्यापेक्षा जास्त पदे होती रिक्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. सदस्यांची निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने अल्पमतात ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमरित्या चालविता येणार नसल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. दरम्यान, बरखास्तीचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात येणार आहे.
ऐनापूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. काँग्रेसप्रणित कुराडे गटाची सत्ता आली. उषा मांगले सरपंच झाल्या होत्या. मात्र, अंतर्गत वादातून त्यांनी सरपंचपदासह सदस्यपदाचाही राजीनामा दिला. त्यानंतर सदस्यपदाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत त्या पुन्हा विजयी झाल्या. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गाच्या त्या एकमेव सदस्य असल्याने मांगले पुन्हा सरपंचपदी विराजमान झाल्या. पण, त्यानंतर नऊ पैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
दरम्यान, ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाली. उषा मांगले यांच्यासह उपसरपंच लहुकुमार दड्डीकर, सदस्य धोंडीबा कांबळे, प्राचना देसाई यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. तर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत बरखास्त करुन प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी (कृषी) सुमेश जज्जलवार यांची नेमणूक करण्याची शिफारस केली होती.
त्यावर निर्णय देताना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे अल्पमतात सक्षमपणे कारभार चालविणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील विशेष तरतूद कलम १४५ (१अ) नुसार ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तो अंमलात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *