पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांचा अभिनव उपक्रम; नव्या 700 पोलिस पाटलांना कर्तव्याचे धडे जिल्हास्तरावरून प्रथमच पोलिस पाटलांना मिळाले मोठे बळ

KHOZ MASTER
1 Min Read

बीड

ग्रामीण भागातील नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना प्रथमच जिल्हास्तरावरून मोठे बळ मिळाले आहे. बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील नव्याने नियुक्त झालेल्या सुमारे 700 पोलिस पाटलांना मार्गदर्शन करत कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण धडे दिले.

ग्रामीण भागात पोलिस पाटील हे गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक गावातील पोलिस पाटलांचा संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी असतो. मात्र, त्यांचे कार्य केवळ ठाण्यापुरते मर्यादित न ठेवता थेट जिल्हास्तरावरून संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्याचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला.

या विशेष प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस पाटलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत गावपातळीवरील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. गावातील तंटे, सामाजिक प्रश्न, संशयास्पद हालचाली तसेच नागरिकांमध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पोलिस पाटलांना काम करताना अधिक आत्मविश्वास आणि प्रशासनाचे पाठबळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या या अभिनव पुढाकाराचे विविध स्तरातून स्वागत होत असून, पोलिस पाटलांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

— धनंजय अंजना आसाराम गुंदेकर, बीड

0 9 7 1 5 8
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *