भादोले : भादोले-कोरेगाव दरम्यानच्या नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. (छायाचित्र ः दिग्विजय मोहिते, घुणकी)
—–
वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती
भादोले-कोरेगाव दरम्यान उभारणी ः कोल्हापूर, सांगलीला जोडणारा जवळचा मार्ग
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ४ : भादोले (ता. हातकणंगले) व कोरेगाव (ता. वाळवा) दरम्यान वारणा नदीवरील नवीन पुलाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना जोडणारा नवा मार्ग होणार असल्याने वाहनधारकांना जवळचा मार्ग होणार आहे. पुणे बंगळूर आणि पेठवडगाव-आष्टा या दोन मार्गांच्या मध्यभागी असलेला हा मार्ग आहे.
कोरगाव-भादोले या दोन गावांच्या दरम्यान वारणा नदीवरील पूल झाल्यास कोरेगाव, बहादूरवाडी, भडकंबे, ढवळी, फार्णेवाडी, नागाव, पोखर्णी, गोटखिंडी, बावची या गावांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग होईलच, पण वेळेच्या बचतीसह ४ ते १५ किमी अंतर कमी होणार आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या खर्चात बचत होणार आहे. चांदोली धरण होण्यापूर्वी वारणा नदीला बारमाही पाणी नव्हते. त्यावेळी नदीपात्रातून नागरिक किणी व भादोलेतून कोल्हापूर जिल्ह्यात ये- जा करीत. धरण झाल्यानंतर वारणा नदी बारमाही वाहू लागली. कोरेगाव परिसरातील नागरिकांना पेठवडगावला जाण्यासाठी बागणी, शिगावमार्गे राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपानी, तांदूळवाडी, कणेगावमार्गे जावे लागत आहे.
वारणा नदीवरील भादोले-कोरेगाव दरम्यान होणाऱ्या नवीन पुलास नाबार्डकडून २५ कोटी रुपये मंजूर होऊन कामाला प्रारंभ झाला आहे. कोरेगाव फाटा ते वारणा नदीपर्यंत पुलास जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र नवीन पूल ते भादोले-किणीकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या हातकणंगले शाखेत या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. काही वर्षांपासून दिलीप पाटील, कृष्णात पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकाम विभाग, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता पी. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी (पश्चिम सांगली) सहायक अभियंता विशाल मोहिते (इस्लामपूर), शाखा अभियंता जे. आर. टेपाळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तानाजी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.
……………………
वारणा नदीवरील भादोले-कोरेगाव दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. नवीन पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचे ऐशी टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२४ ला पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
– जे. आर. टेपाळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती
Leave a comment