Pune News : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ‘सीईओं’ची कारणे दाखवा नोटीस

Khozmaster
2 Min Read

पुणे – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी मंगळवारी (ता.५) जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील विविध प्रकारची तब्बल दोन हजार ७८० प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद करत, शिक्षणाधिकाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ही नोटीस बजावताना ठेवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी शिक्षण विभागातील कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या विभागातील कामांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी समिती नियुक्त केली होती. या समितीने नुकताच या विभागातील प्रलंबित कामांबाबत अहवाल चव्हाण यांना सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

आपण जिल्हा शिक्षणाधिकारी या नात्याने एका विभागाचे प्रमुख आहात. त्यामुळे विभागप्रमुख या नात्याने आपल्या अखत्यारित येत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेळेत काम पूर्ण करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. परंतु आपण ही जबाबदारी पार पाडलेली नाही. त्यामुळे आपल्या कामकाजात हलगर्जीपणा दिसून येत आहे.

तुमचे हे वर्तन कर्तव्यात कसून करणारे असल्याने, आपल्यावर नियमानुसार कारवाई का करू नये, याबाबत त्वरित खुलासा करण्याचा आदेश या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची बाजू घेण्यासाठी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

शिक्षण विभागातील प्रलंबित कामांची संख्या

– दैनिक संदर्भ — १६९०

– वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव — २१०

– भविष्य निर्वाह निधी — ८९

– स्थानिक निधी लेखा परीक्षण — ७१५

– पंचायतराज समिती शक — ७१

– महालेखापाल शक — ०५

0 9 3 7 8 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *