हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली

Khozmaster
1 Min Read

नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे बुधवारी थंडीत अचानक वाढ झाली. पावसानंतर वातावरणात अचानक गारठा आला. बुधवारी शहरात २२.१ अंश इतके कमाल तर १९.२ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसाचे तापमान अचानक कमी झाल्याने बोचरी थंडी जाणवत होती. गेल्या आठवड्यासारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने नागपुरात परत एकदा हिवसाळा आल्याचे स्टेटस बुधवारी सोशल मिडियावर व्हायरल होत होते.

पश्चिम बंगालच्या उपसागरातील मिग्जॉम वादळाचा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांना फटका बसला आहे. या वादळामुळे तयार झालेल्या आर्द्रतेचा परिणाम रायपूर आणि नागपूरपर्यंत पोहोचला आहे. पूर्व विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. उपराजधानीत, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात केवळ तीनच अंशांचाच फरक होता. यामुळे शहरात दिवसभर धुके पसरले होते तसेच बोचरी थंडी जाणवत होती. त्यामुळे पहाटेच्या सुमारास शहरात काही ठिकाणी शेकोट्या पेटल्या.गुरुवारी ७ डिसेंबर रोजीसुद्धा शहर व विदर्भात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता थोडीशी कमी होईल. मात्र, ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. पुढे शुक्रवारपासून मात्र, अंशत: ढगाळ वातावरण राहील. या काळात किमान तापमानात अचानक घसरण होण्याची शक्यता असून खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधिमंडळ परिसरात पावसापासून बचावासाठी ठिकठिकाणी डोम उभारण्यात आले होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *